‘बिग बॉस’च्या घरात पराग व रुपालीच्या लग्नाची तयारी ?

    दिनांक :16-Jun-2019
भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे ‘बिग बॉस’ हा रॲलिटी शो चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी फुलताना दिसतेय. ‘बिग बॉस मराठी २’च्या घरातील लव्हबर्ड्स म्हणजे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले. वूटच्या ‘अनसीन अनदेखा’च्या नवीन क्लिपमध्ये काही वेगळीच खिचडी शिजताना पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक पराग व रुपालीच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.
 
 
सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे, वैशाली म्‍हाडे, रूपाली भोसले, शिवानी सुर्वे व नेहा शितोले हे गार्डनमध्‍ये बसले असताना रूपालीला परागशी विवाह करण्‍यासाठी विचारत असतात. सुरेखाताई रूपालीला चिडवत म्‍हणतात, ”मी चांगली तयारीत होते की, इथून गेल्‍यानंतर गोव्‍याला जायचं लग्‍नाला. माझी एक आवडती साडी मी आणलेली, पण घातली नाही इथे. तुझ्या लग्नाला ती साडी नेसेन असा विचार केला.” यावर रूपाली विचारते, ”ताई माझ्याकडे बघ आणि त्‍याच्‍याकडे बघ, माझ्यात आणि त्‍याच्‍यात काही आहे का साम्‍य?” सुरेखा या प्रश्‍नाची मस्‍करी करत म्‍हणतात, ”दिल गया गधे पे तो परी क्‍या चीज है! तुला टकला पण आवडू शकतो ना!” यावर सर्वजण हसू लागतात. हे सर्व घडत असताना रूपाली सर्व गोष्‍टींना नकार देते आणि म्‍हणते की, तिला परागसारखा पुरूष कधीच आवडणार नाही. पुढे वैशाली म्‍हणते, ”आम्‍हाला गोव्‍याला जायचं आहे, तू कर गं लग्‍न. काल बिचारा एवढं गाणं म्‍हणाला ‘ तेरे से मॅरेज करने को मैं गोवासे मुंबई आया’ अशी कशी विसरली तू?”
रूपाली आणि पराग यांचं घरातील वावरणं पाहून सदस्यांनाही यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली आहे. सिझनच्या दुसऱ्या दिवसापासूनच या दोघांची चांगली मैत्री झाली. घरात रंगणाऱ्या टास्कमध्येही पराग आणि रुपालीची मैत्री दिसून येते. त्यामुळे आता ही प्रेमकहाणी कुठपर्यंत पुढे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.