कर्ज- एक परतफेड...

    दिनांक :16-Jun-2019
माणसं बेटी भलतीच काहीच्या काही वागतात. खरेतर कर्ज, पुस्तके, सीडीज्‌ कुणाकडून घेतले की ते परत करण्याची पद्धत नाही. परंपरा नाही. आपण आपल्या देशातील परंपरांचे पाईक आहोत, त्यामुळे उधारी, कर्ज परत करायचे नसते. मात्र, काही लोक वेडे असतात. आता बघा ना, राजस्थानातील हनुमानगढ़ जिल्ह्यातील रावतसर या छोट्याशा गावातल्या एका युवकाने, त्याच्या वडिलांचे 18 वर्षे जुने कर्ज तेही तब्बल 55 लाख रुपये फेडले. त्याचे वडील, तो लहान असताना बुचूबुचू कर्ज झाल्यामुळे नेपाळला पळून गेले होते. कर्ज काढून विदेशात पळून जाण्याची बाब काही आजची नाही... ही बातमी खोटी वाटण्याची दाट शक्यता असल्याने त्या मुलाचे नावही दिलेच पाहिजे. त्याचे नाव संदीप, वडिलांचे नाव मोतीराम. त्यांची रावतसर येथे जमालिया ट्रेिंडग कंपनी होती. 2001 मध्ये व्यापारात तोटा झाल्याने मोतीराम यांनी अचानक एका रात्री घर सोडले आणि ते नेपाळला निघून गेले. तिथे त्यांनी किराणा दुकान सुरू केले. सहा वर्षांनी मोतीरामचा मृत्यू झाला. त्यांनी रावतसर सोडले तेव्हा संदीप केवळ 12 वर्षांचा होता. त्या वयात त्याने व्यवसाय सुरू केला. गाव सोडले. वडिलांच्या मनात आपण कर्ज बुडविल्याची खंत होती, ती संदीपला लागून राहिली होती. त्याने प्रामाणिकपणे पैसे कमावले आणि अचानक तो त्याच्या या गावी आला नि त्याने व्यापारी मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क करून वडिलांचे कर्ज... थोडेथोडके नव्हे, तर 55 लाख रुपये परत करायचे असल्याचे सांगितले. कुणाचा विश्वास बसला नाही. मात्र, त्याने खरोखरीच कर्ज फेडले... 5 जूनची ही घटना. बँकांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून जाणार्‍या उद्योगपतींच्या देशात हे पोर! छोट्या व्यापारातून पैसे कमावून वडिलांचे अर्धा कोटींचे कर्ज फेडणारा हा पोरही असू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
‘गेलं गेलं गेलं दादा
जुनं राज गेलं
नारंगी मोसंबीनं कंगाल केलंऽऽऽ’
हे असं गाणं तुम्ही ऐकलं आहे का? गावाकडच्या एका जुन्या मित्रानं परवा हे गाणं ऐकवलं. हे तुमडी गीत आहे. आता या गाण्याच्या आधारावरच एक नवं गाणं अस्मादिकांनी त्या मित्राला ऐकविलं.
‘आलं आलं आलं दादा
नवं राज आलं
कर्जाच्या पैशानं श्रीमंत केलं...’
जुन्या काळी अंगावर कुणाचा एक पैसाही नको, असं म्हटलं जायचं. कुणी पैसे मागायला दारात यायला नको, असंच तुमच्या- माझ्या वाडवडिलांना वाटायचं. आता तर ‘विना उधार नाही उद्धार!’ हे नवं सुभाषित आहे...
आता जुन्या काळात अंथरूण पाहून पाय पसरायचे, ही म्हण काही उगाच नव्हती पडली. ‘असेल धमक तर वागव कुमक,’ असंच होतं म्हणे त्या काळात. आता तुम्ही काहीही करत असताना मोबाईलमुळे तुम्हाला लोक (नको ते अन्‌ नको तेव्हा) तुम्हाला पकडत असतात. तिकडून एक तरुणी चुकीचं इंग्रजी बोलत असते. ‘‘सर, मे आय टॉक विथ यू?’’ अशा वेळी आपण तिला म्हणायचं, ‘‘बाई, आपला देश भारत आहे. राज्य महाराष्ट्र आहे. तुला मराठी राज्यातही हिंदीत बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे तू हिंदीत बोल, मराठीत बोलली तर आनंदच आहे; पण चुकीच्या इंग्रजीत कशाला बोलतेस?’’ मग ती तुम्हाला मराठीत सांगते. (म्हणजे ते मराठीच आहे, हे तुम्ही मान्य करायचे असते.) ती सांगते की, ‘‘अमक्या तमक्या बँकेकडून बोलतेय्‌ सर... तुमच्या क्रेडिट कार्डवर आम्ही विशेष कर्ज देऊ इच्छितो किंवा मग तुम्ही आमचे प्रिव्हिलेज्ड ग्राहक असल्याने आम्ही तुम्हाला खास कर्ज ऑफर करतो...’’ तिला तुम्ही सांगायचे की, कर्ज घेऊन कुठल्या देशात पळून जाता येईल, ते बघतो अन्‌ मग सांगतो तुला... मग ती तुम्हाला फोन नाही करत.
त्या काळात कुणाचं कर्ज अंगावर असलं की, झोप नाही यायची अन्‌ आता कर्ज नसलं की सुखाची झोप घेताच येत नाही. तेव्हा कर्ज असणारा माणूस शोधावा लागायचा अन्‌ आता कर्ज नसलेला माणूस शोधून सापडत नाही. हे मात्र खरे आहे की, आजकाल मुलगा जन्माला आल्यापासूनच कर्जाचा अन्‌ त्याचा संबंध असतो. कुणीही सांगतात, त्यांच्या सुनेने तिच्या ऑफिसकडून मॅटर्निटी लोन काढले. त्यांच्या मुलाने पॅटर्निटी लोन काढले तेव्हा कुठे बाळंतपणाचे वैद्यकीय बिल देता आले.
तुम्हाला काहीही करायचे असेल, तर कर्जाशिवाय पर्याय नाही. मुलीचे लग्न करायचे असेल तर बाप लोन काढतो. म्हणजे लग्नापासून कर्ज. मग बाळंतपणाला कर्ज, मुलाला शाळेत टाकायचे असेल तर घ्या कर्ज... म्हणजे बाप कर्जातच मरतो आणि मग लेक त्याच्या व्याजात मरतो! बरं, बँका कर्ज देण्यासाठी तयारच असतात. उद्योेग सुरू करायचा आहे, घ्या कर्ज. शिक्षण घ्यायचं आहे, तर घ्या कर्ज. घरासाठी तर सारेच कर्ज काढतात. ‘कर्जाने होत आहे रे आधी कर्जची पाहिजे...’
शेतीसाठी तर कर्ज काढावेच लागते. दरवर्षीच पीक कर्ज तर घ्यावेच लागते. मुद्दल फिटत नाही अन्‌ मग व्याजच मुद्दलापेक्षा जास्त होते. आता शेतकरी काय माती घेऊन पळून जाणार आहे? अन्‌ गेलाच पळून तर जाणार कुठे? मग तो या जगातून पळून जातो.

 
 
आता शेतकर्‍यावर असलेले कर्ज अगदीच कमी असते. अगदी दहा-पंधरा हजाराच्या कर्जासाठी तो आत्महत्या करतोे. त्याला कर्ज नको असते. त्याच्या मालाला भाव दिला तर त्याला काहीच नको. उद्योगपती मात्र कोट्यवधीने कर्ज काढतात. त्यावर त्यांची शानशौकही चालते. बरे, त्यांच्या मालाचा भाव ते ठरवितात. नफाही कमवितात अन्‌ तरीही कर्ज काही फेडत नाहीत. बँका मग त्यांचे कर्ज बुडीत म्हणून घोषित करतात. ते नादारी घोषित करतात अन्‌ पुन्हा नवे कर्ज घेतात... सात-बारा कोरा केल्याशिवाय नवे कर्ज शेतकर्‍यांना नाही मिळत, मग कोर्‍या करकरीत मोटारी पळविणार्‍या उद्योगपतींना कसे मिळते कर्ज? हा सवाल अनेकांना पडला आहे. ‘‘बरं, बँका उद्योगपतींना कर्ज देतात अन्‌ बँकांना सरकार कर्ज देते त मंग सरकारले कोन कर्ज देते?’’ असं गावाकडच्या मित्रानं विचारलं. त्याचं उत्तर अमेरिका! अमेरिकेचा पैसा कसा येतो, याच्यावर मस्त किस्सा आहे-
एक माणूस समुद्रकिनार्‍यावरच्या एका गावात जहाज थांबल्याने थांबला. त्याला बर्‍यापैकी हॉटेल हवे होते. तिथे एक मोटेल होते. तिथे तो गेला. खोलीचा दर होता 100 डॉलर. खोली बघतो नि मग थांबण्याचा निर्णय घेतो म्हणाला. त्याने 100 डॉलर मोटेलवाल्याला दिले अन्‌ रूम बघायला गेला. इकडे मांसवाला आला, त्याचे पैेसे होते मोटेलवाल्यावर. त्याने 100 डॉलर मांसवाल्याला दिले. मांसवाल्याने त्वरित दारूवाल्याचे पैसे देऊन टाकले. दारूवाल्याने एका वेश्येचे बरेच दिवस द्यायचे राहिलेले पैसे दिले. ती तिचे काम या मोटेलवरच करायची, त्याचे भाडे तिला द्यायचेच होते. ती आली अन्‌ तिने ते 100 डॉलर मोटेलवाल्याला दिले. तितक्यात तो प्रवासी वरून खाली अन्‌ म्हणाला, मला नाही खोल्या पसंत तुमच्या मोटेलच्या. मोटेलवाल्याने त्याला त्याचे पैसे परत केले...
अमेरिकेचे कर्ज असे नांदते भारतात... अन्‌ आमचे लोक कर्ज काढून परत तिकडेच जातात ना पळून!