कर्णधार कोहली सर्वात जलद ११ हजार धावा करणारा खेळाडू

    दिनांक :16-Jun-2019
मँचेस्टर,
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या महामुकाबल्यामध्ये भारतीय फलांदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही शानदार खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने केवळ 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच तो सर्वात वेगाने 11 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.

 
या लढतीला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता होती. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहेत. दरम्यान, विश्वचषकात आज झालेल्या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने शानदार शतक तर राहुलने अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, लोकेश राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. मात्र खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान, विराटने आपल्या 11 हजार धावाही पूर्ण केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 71 धावांवर खेळत होता.
विराट हा सर्वात कमी म्हणजे 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 276 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याबरोबरच 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.