वहाबी म्हणून २७ कुटुंबांचा १९ वर्षांपासून बहिष्कार!

    दिनांक :17-Jun-2019
*मौलवींचा अलिखित फतवा, ‘कच्छीं’कडून अंमलबजावणी
*नागभीड पोलिसांकडून अदखलपात्र कुटुंब त्रस्त
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या ठिकाणी तब्बल 27 मुस्लिम कुटुंबांचा त्यांच्याच एका मौलवींकडून 19 वर्षांपूर्वी सामाजिक बहिष्कार करण्यात आला होता. हे लोक वहाबी आहेत, म्हणून त्यांचा बहिष्कार करा, असा अलिखित फतवा तेव्हा काढला होता. तो आजही तसाच कायम आहे. सामाजिक न्यायासाठी या कुटुंबांतील सदस्यांचा सातत्याने संषर्घ सुरू आहे. पण पोलिस प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.अखेर सोमवार, 17 जून रोजी या कुटुंबांतील काही सदस्यांनी पत्रपरिषद घेऊन त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तसेच त्यांनी पोलिस अधीक्षकांनाही याबाबतची तक्रार दिली.
 

 
 
 
पत्रपरिषदेत रियाज रफिक शेख, हाफिस मोदिम शेख, जफर खान, रहमतुल्ला खान, सादिक खालिब शेख, सादिक सैय्यद आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर प्रदेशातून आलेल्या शाकिर रजा या मोलवीने 2000 साली नागभीड येथील 27 मुस्लिम कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकला. त्यांना मस्जिदमध्ये प्रवेशबंदी तसेच समाजातील लग्न किंवा अन्य कुठल्याही समारंभात उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला. हा अन्याय आजही कायम आहे. हे लोक ‘वाहाबी’ असल्याचा आरोप त्यांच्यावर लावल्या गेला. परंतु, आम्ही सुन्नीच आहोत, असे या अन्यायग्रस्त मुस्लिमबांधवांचे म्हणणे आहे. सद्या हे 27 कुटूंब एका खाजगी जागेत नमाज अदा करतात. त्यास मस्जिद कसे म्हणावे, असा प्रश्न खुद्द याच लोकांना पडला आहे. हा सामाजिक बहिष्कार नागभीड येथील मुस्लिम समाजातल्या कच्छी लोकांनी लावून धरल्याचा आरोप रियाज रफिक शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे.
असाच एक प्रकार ब्रम्हपुरी येथे एकदा घडला असताना तेथील एका महिलेने तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्याकडे तक्रार केली होती. कारवाई होताच, आम्ही असा कुठलाच बहिष्कार टाकला नाही, असे सांगण्यात आले होते. खरे तर, लेखी असा कुठलाच फतवा काढल्या जात नाही. परंतु, संपूर्ण समाजात तोंडी सांगून बहिष्कार घातला जातो. हे दु:ख सध्या नागभीडातील ही 27 कुटूंबे सहन करीत आहे.
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत व्यक्तींच्या संरक्षणार्थ कायदा असतानाही असा प्रकार सुरू असून, कुठलेच राजकीय पुढारी, पोलिस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यात लक्ष घालत नसल्याची खंत रियाज रफिक शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी व्यक्त केली