आसियान विकास बँकेने फेटाळला पाकिस्तानचा दावा

    दिनांक :17-Jun-2019
-340 कोटी डॉलर्सच्या कर्जाबाबात अफवाच 

 
 
इस्लामाबाद,
आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आसियान विकास बँक 340 कोटी डॉलर्सची मदत करणार असल्याची, पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने दिलेली माहिती ही अफवाच ठरली आहे. पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यात आली नसून, याबाबत सध्या केवळ चर्चा सुरू असल्याचे आसियान विकास बँकेने स्पष्ट केल्यामुळे पाकिस्तानची मात्र गोची झाली आहे.
 
आसियान विकास बँक पाकिस्तानला 340 कोटी डॉलर्सचे कर्ज देणार असून, त्यापैकी 210 कोटी डॉलर्सचा पहिला हप्ता वर्षभरात देण्यात येईल, असे पंतप्रधान इम्रान खान यांचे वित्तीय सल्लागार अब्दुल हाफिज शेख आणि योजना विकास आणि सुधारणा मंत्री खुसरो बिख्तयार यांनी सांगितले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर दुसर्‍याच दिवशी आसियान विकास बँकेच्या फिलिपाईन्स येथील मुख्यालयाने पाकिस्तानकडून देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अफवा पसरवल्यावर आसियान विकास बँकेने सुटीच्या दिवशी निवेदन प्रकाशित करून त्याचे खंडन केले आहे. हा प्रकार दुर्मिळ असून, सुटीच्या दिवशी ही बँक निवेदन देत नाही. पाकिस्तान सरकारसोबत बैठका सुरू असून, कर्जाबाबत चर्चा केली जात असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे.
 
आपण पाकिस्तान सरकारसोबत वाटाघाटी करीत आहोत, तसेच नेमके किती कर्ज पाकिस्तानला द्यायचे याची चर्चाही सुरू आहे. या सर्व बाबी निश्चित झाल्यावर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आसियान विकास बँकेच्या व्यवस्थापनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे आसियान विकास बँकेचे पाकिस्तानातील संचालक शियाओहॉंग यांग यांनी सांगितल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहेत.