हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी कार्यकर्ते वांग यांची सुटका

    दिनांक :17-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
हाँगकाँग,
हाँगकाँगमधील लोकशाहीवादी कार्यकर्ते जोशुआ वांग यांची आज सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनी सरकारविरोधी आंदोलनात आपण यापुढेही सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. हाँगकाँगमधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित करण्यात आले असले तरी, हाँगकाँगच्या चीन समर्थक नेत्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी राजीनामा द्यावा, यासाठी तीव्र निदर्शने सुरूच आहेत. 
 
 
कॅरी लॅम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुमारे 20 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. लॅम यांच्या कार्यालयाबाहेरील रस्ते निदर्शकांनी रोखून धरले आहेत. कॅरी लॅम या हाँगकाँगच्या नेतेपदासाठी मुळीच पात्र नाहीत, असे जोशुआ वॉंग आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
 
हत्या आणि बलात्काराच्या गुन्हेगारांना चीनच्या स्वाधीन करण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्याचा निषेध करण्यासाठी हाँगकाँगमध्ये आंदोलन सुरू झाल्याने प्रत्यार्पण विधेयक स्थगित करण्याचा निर्णय लॅम यांना घ्यावा लागला. परंतु, आता लॅम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शक ठाम आहेत.