विश्व तिरंदाजीत भारताला रौप्यपदक

    दिनांक :17-Jun-2019
डेन बॉश (नेदरलॅण्ड्स),
येथे आयोजित विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताला चीनकडून 2-6 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघात तरुणदीप राय, अतानू दास व प्रवीण जाधव यांचा, तर चीनच्या संघात डिंग यिलियांग, वेई शाओशुआन, फेंग हाओ यांचा समावेश होता. 
 
 
पहिल्या सेटच्या मध्यास भारताकडे 27-26 अशी एका गुणाची आघाडी होती. मात्र, अखेरीस पहिला सेट 53-53 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला. दुसर्‍या सेटमध्ये चीनने 58-51 अशी बाजी मारली व 3-1 अशी आघाडी घेतली. तिसरा सेटही 56-56 असा बरोबरीत सुटला. अखेरच्या सेटमध्ये चीनने 57-52 अशी बाजी मारली व सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाला आतापर्यंत सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. भारताचे हे सहावे रौप्य ठरले.
 
दरम्यान, कम्पाऊंट प्रकारात भारतीय महिला संघाने कांस्यपदक मिळविले. या संघात राजकौर, मुस्कान किरार व ज्योती सुरेखा व्हेन्नम यांचा समावेश आहे. ज्योती सुरेखा व्हेन्नमने वैयक्तिक कांस्यपकसुद्धा मिळविले.