सोन्यात गुंतवणूक करताना...

    दिनांक :17-Jun-2019
शेअर बाजारातल्या वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सुरक्षीत आणि चांगला पर्याय म्हणून बघत आहेत. सोन्यावर महागाईच्या वाढत्या दराचा फार परिणाम होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सोन्याचे दर, रुपयाचं डॉलरच्या तुलनेत कमी होत जाणारं किंवा वधारणारं मूल्य, चलनवाढीचा दर, व्याजदर, जागतिक अस्थिरता, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. मधल्या काळात आलेल्या मंदीमुळे लोकांचा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवरचा विश्वास उडाल्याने सोन्याची मागणी वाढली होती. त्यामुळे या मौल्यवान धातूचे दरही चढे राहिले होते. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्यातली गुंतवणूक योग्य ठरते का? 

 
 
सोन्यातली गुंतवणूक ही संकल्पना स्वत:च्या वापरासाठी घेतल्या जाणार्‍या सोन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. मुलीच्या लग्नासाठी किंवा पत्नीला भेट म्हणून घेतलेले सोन्याची दागिने ही गुंतवणूक ठरत नाही. दागिन्यांमध्ये आपली भावनिक गुंतवणूक असल्याने मोठ्या आर्थिक अडचणीशिवाय आपण ते विकत नाही. घडणावळीचं तसंच दागिने विकताना मोडण्यासाठी द्याव्या लागणार्‍या शुल्कामुळे दागिने हा गुंतवणुकीच्या दृष्टीने फारसा योग्य पर्याय ठरत नाही. मग सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी विविध गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे.
 
मुळात शेअर्स, मुदत ठेवी, गव्हर्न्मेंट बॉंड्‌सप्रमाणे सोन्याला उत्पन्न मूल्य क्षमता नसते. सोनं वाढत नाही, त्यावर चक्रवाढव्याजाचे लाभ मिळत नाहीत. त्यावर कोणतंही उत्पन्न मिळत नाही. यामुळे ही फक्त पडून राहिलेली गुंतवणूक ठरते. भविष्यातल्या सोन्याच्या मागणीवर या धातूच्या मूल्याची वाढ अवलंबून असते. सोन्याचं मूल्य वधारल्यावर त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने लोकं सोन्यात गुंतवणूक करतात. त्यातच सोन्याचे दागिने, विटा आणि नाण्यांपेक्षा गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्यातल्या गुंतवणुकीचे अधिक चांगले पर्याय आहेत.
 
सरकारने बाजारात आणलेले सॉव्हरीन गोल्ड बॉंड्‌स हा सुद्धा सोन्यातल्या गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून समोर आला आहे. गुंतवणूकदारांनी सोन्यापेक्षा आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करायला हवं, असं आर्थिक तज्ज्ञांना वाटतं. आपली उद्दिष्टं पूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेली वाटचाल तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल.