स्विस बँकेची 50 भारतीय खातेदारांना नोटीस

    दिनांक :17-Jun-2019
नवी दिल्ली/बर्न, 
स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये निनावी खाते ठेवणार्‍या भारतीयांविरुद्ध दोन्ही देशांच्या सरकारने फास आवळायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात किमान 50 भारतीयांची माहिती भारतीय अधिकार्‍यांना सोपविण्यासाठी स्वित्झर्लंडच्या अधिकार्‍यांनी तयारी सुरू केली आहे. 

 
 
स्वित्झर्लंडमध्ये खाते असणार्‍या लोकांमध्ये जमिनी, आर्थिक सेवा, तंत्रज्ञान, दूरसंचार, पेंट, कपडे, इंजिनिअरिंगशी संबंधित वस्तू आणि रत्न व दागिने क्षेत्राशी संबंधित व्यवसायिक कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही बेनामी कंपन्याही असू शकतात. दोन्ही देशात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.
 
कर चोरी करणार्‍यांना स्वित्झर्लंडकडून आश्रय दिला जातो, अशी टीका पूर्वीपासून होत होती. देशाची ही प्रतिमा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंड विविध देशांना आता माहिती देत आहे. भारतात काळ्या पैशांचा मुद्दा राजकीय स्तरावर संवेदनशील आहे. स्वित्झर्लंड सरकारने राजपत्रामधून याबाबतची माहिती सार्वजनिक करताना पूर्ण नाव न सांगता केवळ सुरुवातीची अक्षरे सांगितली आहेत. यामध्ये ग्राहकाची राष्ट्रीयता आणि जन्म दिवस याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, 21 मे रोजी 70 भारतीयांना नोटिस जारी करण्यात आली आहे. यात दोन जणांची पूर्ण नावे सांगण्यात आली आहेत.
 
यात मे 1949 चा जन्म असलेले कृष्ण भगवान रामचंद आणि सप्टेंबर 1972 चा जन्म असलेले कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे. अर्थात्‌ त्यांच्याबाबत अन्य माहितीचा खुलासा करण्यात आला नाही. अन्य नावे जाहीर करताना 24 नोव्हेंबर 1944 चा जन्म असलेले एएसबीके याप्रमाणे उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित ग्राहक अथवा त्यांचे प्रतिनिधीने आवश्यक दस्तऐवजांसह 30 दिवसांच्या आत अपिल करण्यासाठी हजर राहावे, असे या नोटिसमध्ये म्हटले आहे.
 
स्वित्झर्लंडच्या अधिकार्‍यांनी मार्चपासून आतापर्यंत किमान 50 भारतीय खातेधारकांना नोटिस देत, त्यांची माहिती भारत सरकारला देण्यापूर्वी त्यांना अपिल करण्याची शेवटची संधी दिली आहे.