अमरावती : बसपाच्या प्रदेश प्रभारीला मारहाण

    दिनांक :17-Jun-2019
पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक उधळली
 
अमरावती: बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारीला राष्ट्रीय महासचिवाच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली व त्यांचे कपडे फाडले. जोरदार नारेबाजी झाली. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान कॅम्प परिसरातल्या शासकीय विश्रामगृह येथे घडली.
 

 
 
 
ऍड. संदीप ताजने असे कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या प्रदेश प्रभारीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला ऍड ताजने यांच्या समवेत राष्ट्रीय महासचिव प्रमोद रैना, दुसरे प्रदेश प्रभारी श्रीकृष्ण बेले, प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक चेतन पवार हे प्रमुख आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू होताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बैठक अंतर्गत असल्याचे कारण सांगून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यावर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. पहिले तुम्ही लोकसभा निवडणुकीतल्या पक्षाच्या ढिसाळ कामगिरीचा जाब द्या, विधानपरिषद निवडणुकीतही असाच धंदा झाला, असा आरोप करून सर्व पदाधिकारी उभे झाले. त्यातील काही कार्यकर्त्यांनी सभागृहातल्या
फायबरच्या खुर्च्या हातात धरून व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावणे सुरू केले. त्यामुळे एकदम तणाव निर्माण झाला. सर्वात जास्त रोष ऍड. ताजने यांच्यावरच होता. त्यांच्या जवळ जाऊन काही कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्चीने मारहाण सुरू केली. इतरही प्रमुख नेत्यांना खर्चीचा मार बसला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ऍड. ताजने यांना काही कार्यकर्त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे संतापलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ताजने यांना पकडले व त्याचे शर्ट ओढून फाडून टाकले. कसाबसा जीव मुठीत घेऊन ते पळत सुटले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षित खोलीत नेले. त्या खोलीवरही कार्यकर्ते धडकले. दुसरीकडे अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारमध्ये बसून चेतन पवार घेवून जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांची कार रोखून धरली व ऍड. संदीप ताजने चोर आहे, अशी नारेबाजी सुरू केली. ती इतकी विकोपाला गेली होती की प्रमुख पदाधिकारी एकवेळ चांगलेच घाबरले होते. कसेतरी ते तेथून निघून गेले. त्यानंतर फ्रेजरपूर पोलिस तेथे पोहचले. कार्यकर्त्यांना त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांच्या सुरक्षेमध्ये ऍड. ताजने यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या प्रकरणाची पोलिसात तक्रार करणार नसल्याचे ताजने यांनी बोलताना सांगितले. जो पर्यंत पक्षातल्या दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे कार्यकर्त्यांचे म्हणे होते.