सलमानला जोधपूर कोर्टाकडूनही दिलासा

    दिनांक :17-Jun-2019
जोधपूर कोर्टाने अभिनेता सलमान खानला खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही दिलासा दिला आहे. चिंकारा शिकार प्रकरणात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. २००६ मध्ये सलमान खानने एक खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ज्यामध्ये सलमानने त्याचा शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचं म्हटलं होतं. मात्र आता प्रकरणातही सलमान खानला कोर्टाने दिलासा दिला आहे. खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करावं हा सलमानचा हेतू नव्हता असा दावाही त्याच्या वकिलांनी केला आहे.
 
 
१९९८ मध्ये सलमान खान ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला होता. त्यावेळी चिंकारा शिकार प्रकरणात सलमान खानवर तीन आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात एक गुन्हा दाखल होता. आर्म्स अॅक्ट प्रकरणात सलमान खानला याआधीच दिलासा मिळाला आहे. आता आणखी एका प्रकरणात त्याला दिलासा देण्यात आला आहे.
 
 
 
या सगळ्या खटल्याच्या दरम्यान सलमान खानला त्याचा शस्त्र परवाना कोर्टात जमा करायचा होता. मात्र सलमान खानने हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले होते. मात्र सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी २००६ मध्येच करण्यात आली होती. आता या प्रकरणातही सलमान खानला दिलासा मिळाला आहे.