आतापर्यंत उष्माघाताचे नागपुरात ३२८ रुग्ण

    दिनांक :17-Jun-2019
नागपूर : नागपुरात दोन-तीन दिवसांपासून उष्मा प्रचंड तापत असून काल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा असली तरी उष्मा आणखी काही दिवस तरी नागपूरकरांना सहन करावा लागणार आहे. नागपुरात काल शुक्रवारी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील चंद्रपूर तापमानात सातत्याने पहिल्या तर काल ब्रह्मपुरी दुसर्‍या, गडचिरोली तिसर्‍या तर नागपूर व वर्धा चौथ्या स्थानावर होते. त्यानंतर गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला आदींचा क्रमांक लागतो. विदर्भातील इतर गावांसह नागपुरातही विविध ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे काही वेळ थंडावा जाणवत असला तरी नंतर प्रचंड उष्मा निर्माण होतो. हाच उष्मा तापदायक ठरत आहे.
 
 
जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल, असा सर्वसामान्यांचा समज आहे. अनेक जलाशये आटली आहे. सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, पावसाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आज दिवसभर उन्ह व ढगांचा खेळ सुरू होता. या प्रचंड उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहात आहेत. कूलरची घरघर आणि एसीचा थंडावा काम करेनासा झाला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणार्‍यांना मात्र घामात भिजण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. या वाढत्या उष्म्यामुळे यंदा उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 328 झाली. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका लक्षात घेता मेडिकल रुग्णालय, मेयो रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय आदी सरकारी रुग्णालयांमध्ये कोल्ड वार्ड सुसज्ज असून तिथे उष्माघाताचे रुग्ण दाखलही झाले होते. नागपुरातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात केली जाते. आज शनिवारी सायंकाळपर्यंत नागपुरात उष्माघाताच्या 328 रुग्णांची नोंद झाली होती. उष्माघाताचे 9 रुग्ण दाखल होते. त्यांना सुट्टी देण्यात आली. मृत्यू मात्र एकही नसल्याचे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागपूर शहरातील सरकारी व खासगी रुग्णालये मिळून यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत गॅस्ट्रोच्या 117 रुग्णांची नोंद झाली आहे.