#ICCWorldCup2019 : सर्फराज अहमद 'बिनडोक' कर्णधार; शोएब अख्तर संतापला

    दिनांक :17-Jun-2019
मँचेस्टर,
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर टीका करताना त्याला चक्क 'बिनडोक' म्हटले आहे. टॉस जिंकल्यानंतरही सर्फराजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मतही अख्तरने व्यक्त केले. 
 
 
शोएब म्हणाला,''खेळपट्टी पूर्णपणे कोरडी होती. ती संपूर्ण वेळ झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावर दव जमण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बिनडोकच घेऊ शकतो.'' चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने अशी चूक केली होती आणि आज पाकिस्तानने त्याची पुनरावृत्ती केली. असेही अख्तर म्हणाला. 
 
तो पुढे म्हणाला,'' पाकिस्तानला भारताविरुद्ध विश्वचषकाच्या इतिहासात कधीही धावांचा विजयी पाठलाग करता आलेला नाही. 1999 ला पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीनंतरही 227 धावा चेस करता आल्या नव्हत्या. असे असताना सर्फराजने हा निर्णय का घेतला, हे काही कळेना.''