सुनील मेंढेंनी संस्कृतमधून घेतली खासदारकीची शपथ

    दिनांक :17-Jun-2019
भंडारा: भंडारा लोकसभेचे नवनिर्वाचीत खासदार सुनील मेंढे यांनी आज संस्कृत भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. खासदारांनी संस्कृतमध्ये शपथ घ्यावी याकरिता संस्कृत भारती भंडारा शाखेच्या वतीने खासदारांना निवेदन देण्यात आले होते.
संस्कृत भारती हे संघटन संस्कृत भाषेच्या संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी कार्य करते. याच संस्कृतला लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजपाने लोकांपुढे ठेवलेल्या वचननाम्यात स्थान देण्यात आले आहे. संस्कृतच्या संवर्धन आणि प्रचारासाठी शासन कटिबद्ध असेल, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे याची सुरुवात व्हावी या दृष्टीने नवनिर्वाचीत खासदारांनी संस्कृत भाषेतून खासदार पदाची शपथ घ्यावी, असा आग्रह संस्कृत भारती विदर्भ प्रांत शाखेच्या वतीने धरला होता. यावेळी मेंढे यांनी आपण संस्कृत मधूनच शपथ घेणार असल्याची ग्वाही दिली होती. दिलेला शब्द पाळत आज संस्कृतच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी संस्कृत भारतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. दिलेला शब्द पाळत आज लोकसभेत त्यांनी संस्कृत भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. याबद्दल संस्कृत भारतीने त्यांचे आभार मानले आहे.