इंडियाच्या विजयावर तैमुरचं सेलिब्रेशन

    दिनांक :17-Jun-2019
वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं. रोहित शर्माची खणखणीत १४० धावांची खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केलं. ज्यानंतर अवघ्या देशभरात दिवाळी साजरी झाली. सोशल मीडियावरही या विजयाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सेलिब्रिटींनीही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच सोशल मीडियावर एका फोटोने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो आहे तैमुर अली खानचा. टीम इंडियाचा विजय तैमुरनेही त्याच्या अंदाजात साजरा केल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे.

 
 
या फोटोमध्ये तैमुर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहायला मिळत आहे. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर तैमुरने टीम इंडियाला सलाम केला आहे. सध्या तैमुर लंडनमध्ये आई करिना कपूर व वडील सैफ अली खान यांच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तर सैफ अली खान सामना पाहण्यासाठी मँचेस्टरच्या स्टेडियममध्ये उपस्थित होता.
भारत व पाकिस्तान या दोन देशांचे संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन देशांमधला क्रिकेटचा सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. त्याचमुळे हा सामना भारताने जिंकल्यावर लोकांचा आनंद द्विगुणित झाला. रात्रभर देशात दिवाळीचं वातावरण या विजयी जल्लोषानंतर पाहण्यास मिळालं.