तरुण भारत चंद्रपूर आवृत्तीच्या 'सिद्धता' विशेषांकाचे प्रकाशन

    दिनांक :17-Jun-2019
विभिन्न विषयांवर विशेषांक काढण्याची परंपरा कौतुकास्पद
*सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता राजू घुगे यांचे प्रतिपादन
*‘सिध्दता’चा प्रकाशन सोहळा
चंद्रपूर: तभाच्या चंद्रपूर आवृत्तीने एक तप पूर्ण केले असून, यंदा 14 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सिध्दता’चे प्रकाशन झाले. दरवर्षी या सोहळ्याचे औचित्य साधून समाजोन्नतीच्या नवनवीन विषयांवर असे संग्रही विशेषांक वाचकांच्या हाती देण्याची तभाची परंपरा कौतुकास्पद आहे. माहिती देणे, हे वर्तमानपत्रांचे कार्य असून, दैनंदिन अंकातून ते होत असते. पण त्याहीपुढे जाऊन परिस्थितीचे विश्लेषण करणे, समाज प्रबोधन करणे हेही कार्य वर्तमानपत्र करीत आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे नवनियुक्त मुख्य अभियंता राजू घुगे यांनी केले.
दै. तरुण भारत चंद्रपूर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘सिध्दता’ या विशेषांकाचे प्रकाशन राजू घुगे यांच्या हस्ते सोमवार, 17 जून रोजी दुपारी सिएसटीपीएसच्या सभागृहात पार पडले. यावेळी तभाचे संचालन करणार्‍या श्री. नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे प्रबंध संचालक धनंजय बापट, सिएसटीपीएसचे उपमुख्य अभियंता मधुकर परचाके, ओस्वाल, रॉयल टॉयगर रिसोर्टचे संचालक दीना रूपदे, विशेषांकाचे संयोजक व संपादक संजय रामगिरवार उपस्थित होते.
 

 
 
 
मानवी जीवनाशी सांगड घालणार्‍या बर्‍याच विषयांना स्पर्श करण्याचा हा एक वेगळ्या धाटणीचा प्रयत्न तभाने चालवला असून, चंद्रपूर जिल्हयातील ‘पर्यटन’, ‘उद्योग’, ‘विकास’, ‘सेवा’ व ‘देवदर्शन’ हे विशेषांक वाचकांना समर्पित केले गेले. तसेच जिल्ह्यातल्या राजकीय पटलावरील स्थीत्यंतरे टिपणारे ‘उत्तुंग’, विविध संस्था, प्रतिष्ठानांच्या प्रगतीवर प्रकाश टाकणारी ‘प्रगती’ आणि जिल्हा विकासाचा आढावा घेणारे ‘अच्छे दिन’ही समाजासमोर मांडले गेले. पाण्याच्या भीषण समस्येची वास्तववादी मांडणी केलेल्या ‘जलसंवर्धन’ विशेषांकातून प्रदुषणाचे जळजळीत वास्तवही समाजाभिमुख केले गेले. गतवर्षी ‘वनवैभव’ पुरवणी वाचकांना खुप आवडली. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने संभाव्य उमदेवारांची ‘सिध्दता’ उजागर करण्याचा हा लहानसा प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वी झाला याबद्दल समाधान आहे, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संजय रामगिरवार यांनी केेले. प्रारंभी, मुख्य अभियंतापदावर नियुक्ती झाल्याबद्दल राजू घुगे यांचे तभाच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता यांचे स्वीय सहायक कोपुलवार, तभाचे सुशील नगराळे, स्वप्निल राजुरकर, नरेंद्र चटप, संदीप पाचभाई उपस्थित होते.