इजिप्तच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे न्यायालयात निधन

    दिनांक :18-Jun-2019
काहिरा, 
इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे न्यायालय परिसरात निधन झाले. सरकारी वृत्तवाहिनीने ही माहिती जाहीर केली आहे. गुप्तहेरी करण्याच्या आरोपाच्या सुनावणीसाठी 67 वर्षीय मोहम्मद मोर्सी न्यायालयात हजर होते. त्यावेळी अचानक ते बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मोहम्मद मोर्सीवर पॅलेस्टाईन इस्लामी संघटना- हमाससोबत संबंध असल्याचा आणि हेरगिरीचा आरोप होता. तसेच 2012 साली आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या हत्येसाठी ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते. मोर्सी हे 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले होते.
 
 
हुस्नी मुबारक यांना पदावरून हटवल्यानंतर तिथे प्रदीर्घ काळाने निवडणूक झाली होती. मोर्सी यांचा संबंध मुस्लिम ब‘दरहूड या देशातील सर्वात मोठ्या इस्लामी संघटनेशी होता. पण आता ही संघटना बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. इजिप्तच्या सैन्याने आंदोलन आणि विरोधानंतर 2013 मध्ये मोर्सी यांची सत्ता उलथवली होती आणि ब‘दरहूडला ठेचून काढले होते. सैन्याने मोर्सीसह संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक केली होती. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करणारे मोर्सी व्यवसायाने अभियंता होते.