ICCWorldCup2019 : अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंडचा धावांचा डोंगर

    दिनांक :18-Jun-2019
मॅन्चेस्टर, 
अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी धुव्वाधार फलंदाजी करत 397 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या झंझावती 148 धावा, सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो (90), जो रूट (88) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवले. 
 
 
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स व्हिन्स व जॉनी बेअरस्टो यांनी 44 धावांची सलामी भागीदारी केली आणि नंतर व्हिन्स बाद झाला.
 
 
 
त्यानंतर बेअरस्टोने जो रूटच्या साथीने डाव सांभाळला. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. 90 धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.
 
 
 
रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तडाखेबंद फलंदाजी करत अवघ्या 57 चेंडूत 100 धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल 17 षट्‌कार व 4 चौकारांच्या मदतीने 71 चेंडूत 148 धावांची खेळी केली. फटकेबाजी करण्याच्या नादात रूट व मॉर्गन हे दोघेही एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये परत गेले. त्यानंतर मोईन अलीने 4 षट्‌कार व 1 चौकार खेचत 9 चेंडूत नाबाद 31 धावांची भर घालत संघाला 50 षटकात 6 बाद 397 धावांचा टप्पा गाठून दिला. अफगाणिस्तानकडून दौलत झादरान व गुलाबदीन नेबने प्रत्येकी 3 बळी टिपले. रशिद खानने 9 षटकात एकही बळी न टिपता तब्बल 110 वाटल्या.