भारताची फिजीवर ११-० ने मात

    दिनांक :18-Jun-2019
हिरोशिमा,
गुरजीत कौरच्या हॅट्‌ट्रिकसह चार गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने फिजी संघावर सरळ 11-0 गोलने दणदणीत विजय नोंदवून एफआयएच वूमेन्स सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता शनिवारी भारतीय संघ उपांत्य सामना खेळेल.
 
 
अ गटाच्या या एकतर्फी ठरलेल्या सामन्यात भारतासाठी गुरजीतने 15 व्या, 19 व्या, 21 व्या आणि 22 व्या मिनिटाला असे चार गोल नोंदविले, तर मोनिकाने 11 व्या व 33 व्या मिनिटाला अशा दोन गोलची भर घातली. लालरेमसियामी (चौथ्या), राणी (10 व्या), वंदना कटारिया (12 व्या), लिलिमा मिंझ (51 व्या) व नवनीत कौर (57 व्या) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
 
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात तळाचे मानांकन असलेल्या फिजी संघावर वर्चस्व गाजविले. साठ मिनिटांच्या खेळात फिजी संघाला केवळ एकावेळी सर्कलमध्ये प्रवेश करता आला, तर तर भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात 74 वेळा प्रवेश केला.