बिग बींची ‘See Now’ मोहीम

    दिनांक :18-Jun-2019
बॉलिवूड शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन अनेक वेळा त्यांचं सामाजिक भान जपताना पाहायला मिळतात. त्यांनी आतापर्यंत विविध मार्गांनी समाजोपयोगी काम करत सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिले आहे. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक काम हाती घेतलं असून नुकतंच त्यांनी उत्तर प्रदेशातील जनतेसाठी ‘See Now’ ही मोहीम सुरु केली आहे. खासकरुन अंधत्वावर मात करण्याविषयीची जनजागृती करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
 
 
ही मोहीम खासकरुन उत्तर प्रदेशमधील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यामध्ये उन्नाव, लखनौ, रायबरेली, लखीमपूर कीरी आणि सीतापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये रेडिओ, टिव्ही,सोशल मीडिया, व्हॉट्स अॅप आणि मेसेज यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यात डोळ्यांची काळजी घेणे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणे आणि त्या योजनांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग अशा काही गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
अमिताभ बच्चन स्वत: चष्म्याचा वापर करतात. त्यामुळे दृष्टीसंबंधित कोणतीही तक्रार असेल,तर या तक्रारींवर चष्माचा वापर कसा फायदेशीर ठरेल याविषयीचं मार्गदर्शन ते स्वत: करणार आहेत. “देशामध्ये अनेकजणांना नेत्रदृष्टीची समस्या आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांमध्ये समज-गैरसमज निर्माण होता”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.
दरम्यान, येथील जनतेला आय केअरशीसंबंधित अपुरी माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे अकालीपणे येणाऱ्या अंधत्वावर मात करता येऊ शकते. अमिताभ बच्चन यांची ‘See Now’ ही मोहीम द फ्रेंड होलोड फाऊंडेशन आणि इस्सिलोर व्हिजन फाऊंडेशन यांनी सिघतसेवर्स इंडिया आणि विजन २०२० यांच्यासह एकत्र येऊन सुरु केली आहे.