मुजोरी कायम...

    दिनांक :18-Jun-2019
थर्ड ओपिनियन...
मिलिंद महाजन
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार, हे शंभर टक्के खरे आहे. त्याला कितीही वाकवून सरळ करा, पण ते काही केल्या सरळ होत नाही. असेच काहीसे कालच्या हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामन्याचे झाले. पाकिस्तान क्रिकेट संघाने कशीही व्यूहरचना आखली, लाख प्रयत्न केले तरीही त्यांना क्रिकेट विश्वचषक सामन्यात भारताला हरवता आले नाही. विश्वचषकातील सातव्या सामन्यातही विराट कोहलीने भारताला पाकविरुद्ध विजय मिळवून दिला. 
 
 
भारतीय क्रिकेट संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम प्रदर्शन करत विश्वचषकात पाकविरुद्ध आपल्या विजयाची परंपरा कायम राखली. वास्तविक पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्करातील 40 जवान शहीद झाले, तेव्हाच भारतीयांमध्ये पाकविरुद्ध संताप उफाळला होता. त्याचवेळी तमाम भारतीयांनी तसेच काही दिग्गज खेळाडूंनी विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळू नये, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. बीसीसीआयने मात्र याबाबतचा निर्णय सरकारवर ढकलला.
 
मायबाप सरकार म्हणेल तसे. यात केवळ एकटा महान क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर ठामपणे म्हणाला होता की, तसेही विश्वचषकात आपण त्यांना हरवित आलो आहे आणि या सामन्यातही हरविणार आहे. मग खेळून पूर्ण दोन गुण वसूल करा. न खेळता पाकिस्तानला फुकटात एक गुण कशाला देता? भारतीय संघ मजबूत असून पाकिस्तानला कधीही आणि कुठेही हरविण्यास सक्षम आहे. त्यावेळी काहींनी सचिनच्या वक्तव्यावर टीका केली होती, परंतु आज सचिनचे ते शब्द खरे ठरले. सचिनचा हा सुज्ञपणा. खेळ आणि राजकारण दोघांनीही अगदी सहजतेने वेगळे ठेवले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघानेही या सामन्याबाबत संयम राखला. पाकिस्तानविरुद्धचा सामना आमच्यासाठी विशेष नाही. आमच्या इतर प्रतिस्पर्धी संघांप्रमाणे तोही एक आहे. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळतो आणि हा सामनासुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे जिंकण्याचा प्रयत्न करणार, मग प्रतिस्पर्धी पाकिस्तान का असेना. भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात अप्रतिम प्रदर्शन करत हा सामना जिंकला.
 
तिकडे पाकिस्तान संघाची मुजोरी कायमच आहे. यंदा भारताची विश्वचषकातील विजयाची परंपरा आम्ही खंडित करून असे पाकचा माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू इंझमाम उल हक म्हणाला होता. मात्र गत बुधवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 308 धावांचा पाठलाग करतानाच पाकिस्तान संघाच्या तोंडाला फेस आला होता आणि संघ 266 धावातच गारद झाला. तरीही पाकिस्तान संघाची मुजोरी कायमच आहे. आता भारताविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानची तीच गती झाली. तरीही पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे आणि पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी या सामन्यापूर्वी आपल्या संघाला सल्ला दिला होता की, नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करा.
 
परंतु कर्णधार सर्फराज अहमद यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. सर्फराजने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकेकाळचा दिग्गज क्रिकेटपटू आणि आताचे पंतप्रधान यांच्या अनुभवाच्या बोलाकडे दुर्लक्ष हा मुजोरीपणा पाक संघाला नडलाच. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही पाकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. किमान या सामन्यातील अनुभवातून तरी सर्फराजने धडा घ्यायला हवा होता. असो शेवटी पाकिस्तान संघाचे जे व्हायचे ते झाले. आपल्या भारतीय संघाने अपेक्षेनुसार पाकिस्तान संघाला चारही कोने चीत केले. विश्वचषकातला हा मोठा सामना जिंकला. संपूर्ण भारतात एकच जल्लोष झाला.