मेलकोटे आणि नैसर्गिक सौंदर्य

    दिनांक :18-Jun-2019
पल्लवी जठार-खताळ
 
निसर्गसंपन्न कर्नाटक राज्यातील मैसूरपासून 60 किमीवर वसलेले ‘मेलकोटे’ हे एक सुंदर गाव नैसर्गिक सौंदर्य आणि पौराणिक स्थळांनी परिपूर्ण असे एक मस्त पर्यटन स्थळ आहे मात्र त्याचा व्हावा तितका परिचय अजून पर्यटकांना झालेला नाही. समुद्रसपाटीपासून तीन हजार फुट उंचीवर असलेले हे हिल स्टेशन अनेक अर्थानी वेगळे आहे. कन्नड भाषेत मेळूकोटे या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ दुर्ग असा आहे पण आता याचा अपभ्रंश मेलकोटे असा झाला आहे. गाजलेल्या भूलभुलैय्या या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग येथे झाले होते असे सांगतात.  
 
या गावातील सर्वात खास आहे- तो मुख्य रस्ता राजबिथी म्हणजे ‘राजपथ!’ या रस्त्यावर 100-150 वर्षे जुनी अनेक घरे असून तेथे आजही पुरोहित राहतात. या गावात लहानमोठे 108 तलाव आहेत. त्या प्रत्येकाची कथा वेगळी आहे. पैकी अक्का तंगीकोला म्हणजे मोठी बहीण आणि लहान बहीण तलाव. हे तलाव या बहिणींच्या वडिलांनी बांधले. मोठी स्वभावाने जरा दुष्ट होती म्हणून तिच्या तलावातील पाणी दूषित आहे तर धाकटी स्वभावाने दयाळू होती म्हणून तिच्या तलावातील पाणी चांगले असून आजही ते पिण्यासाठी वापरले जाते.
 
पहाडांच्या कुशीत हे गाव वसले असून घरांभोवती आणि आसपास नारळी, आमराया, काजू बागा आहेत. गावात प्रवेश करताच शुद्ध हवेचा अनुभव येतो. गावात जुन्या दुमजली इमारती आहेत. महाल, मोठी अंगणे असलेली घरे आहेत. कल्याणी हा गावातील सर्वात मोठा तलाव असून तेथे मोठा मंडप आहे. येथे विवाह, अन्य कार्यक्रम साजरे होतात. हा मंडप 900 वर्षांपूर्वींचा असून त्यावर सुंदर कलाकुसर आहे. हे तीर्थस्थळ मानले जाते. येथून गावाबाहेर टेकडीवर असलेले नरिंसहमंदिर स्पष्ट दिसते. या मंदिरात जाण्यासाठी 600 पायर्‍या चढाव्या लागतात. येथे योगमुद्रा आसनात बसलेली प्राचीन नरिंसह मूर्ती आहे.
 
रामानुजन यांनी बांधलेले 12 व्या शतकातले छलवानारायण मंदिर असून त्यात भगवान संपथकुमार यांची मूर्ती आहे. ही मूर्ती प्राचीन म्हणजे 900 वर्षांपूर्वीची आहे. रामानुजन येथे काही काळ राहिले होते, तेव्हा त्यांच्या नजरेखाली येथे गड, मंदिरे, तलाव बांधले गेले असे सांगतात.
 
या गावाची तार रामायणाशी जुळलेली आहे. असे मानतात श्रीराम येथे सीता व लक्ष्मण यांच्यासह वनवासात असताना काही काळ राहिले होते. तेव्हा सीतेची तहान भागविण्यासाठी रामाने बाण मारून पहाडातून पाणी काढले ते आजही वाहते आहे. येथे रामाची पदचिन्हे आहेत. या ठिकाणी राहण्यासाठी ‘होम स्टे’ची चांगली व्यवस्था असून दाक्षिणात्य विविध खाद्यपदार्थ मिळतात.