ICCWorldCup2019 : दक्षिण आफ्रिकेचा लुंगी परतण्यास उत्सुक

    दिनांक :18-Jun-2019
बर्मिंगम,
दक्षिण आफ्रिकेचा लुंगी नगिदी 100 टक्के तंदुरुस्त असून तो बुधवारी येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट सामन्यात परतण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेची विश्वचषकातील सुरुवातच निराशाजनक झाली. त्यांनी आपले पहिले तीनही सामने गमावले आणि एक सामना पावसामुळे वाया गेला. शिवाय संघाला खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येनेही ग्रासले. लुंगी नगिदी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी तो विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. 
न्यूझीलंड व भारताचे प्रत्येकी सात गुण झाले असून सरस धावगतीच्या आधारावर ते सध्या अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकाचे पाच सामन्यातील एका विजयासह तीन गुण झाले असून ते आठव्या स्थानावर आहे.
 
मी आजच फिटनेस चाचणी दिली व उत्तीर्ण केली. त्यामुळे मी बुधवारच्या सामन्यासाठी फिट आहे. आता मी शंभर टक्के तंदुरुस्त झालो आहे. जर मला खेळायला मिळाले नाही, तर फार अस्वस्थ होईल, असे लुंगी म्हणाला. विश्वचषकाच्या प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन या दुखापीतमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले, तर लुंगीला तीन सामन्यातून बाहेर व्हावे लागले.
 
पहिले तीन सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गतसामन्यात अफगाणिस्तावर विजय नोंदविण्यात यश मिळाले. आता आफ्रिकेला अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक राहील. न्यूझीलंड संघातही काही कमकुवतपणा आहे, त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यांची मधली व तळाची फळी फारशी मजबूत नाही, असे लुंगीला वाटते. न्यूझीलंडच्या बहुतांश धावा ह्या पहिल्या फळीतील फलंदाजांनीच काढल्या आहेत, असेही लुंगी म्हणाला.