संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पुरक- डॉ. मोहनजी भागवत

    दिनांक :18-Jun-2019
अमरावतीच्या महानुभाव आश्रमाला दिली भेट
 
अमरावती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पुरक असून दोघांचीही नाळ घट्ट जुळलेली आहे. धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे हे कार्य असेच अविरत पुढे सुरू राहील असा विश्‍वास व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गत काळातील आठवणींना उजाळा दिला.
शहरातल्या राजापेठ परिसराला लागून असलेल्या कंवरनगर येथील महानुभाव आश्रमात मंगळवारी सकाळी डॉ. मोहनजी भागवत यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी आश्रमाचे नवे उत्तराधिकारी आचार्य मोहनराजदादा कारंजेकर (अमृते) यांची भेट घेऊन शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर आचार्य मोहनराजदादा यांनी सरसंघचालक डॉ. भागवत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सन्मान केला. याचवेळी महंत येळमकर बाबा, महंत यक्षदेव बाबा यांचा मोहनजींनी सत्कार केला. यावेळी महंत नांदेडकर बाबा, पैठणकर बाबा, पाचराऊत बाबा, वाईनदेशकर बाबा, जयराज बाबा, विश्‍वनाथ बाबा, कान्हेराज बाबा, चीरडे बाबा, तळेगावकर बाबा, सोनपेठकर बाबा, संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, अमरावती विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक सुनील सरोदे, नगर संघचालक अविनाश चुटके, श्याम निचीत, विभाग कार्यवाह शिवा पिंपळकर, महानगर कार्यवाह संजय गुळवे व अन्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 

 
 
डॉ. मोहनजी पुढे म्हणाले, संघ व महानुभाव पंथाला जोडण्याचे कार्य स्व. दादाराव भडके यांनी केले. कार्याची दिशा स्पष्ट असल्यामुळे संबध वृद्धींगत होत गेले. संत व संघाचे आध्यात्मशक्तीचे हे कार्य व्यापक स्वरूपात जोमाने सुरू राहील. आश्रमाच्या संदेश पुस्तिकेत सरसंघचालकांनी संदेशही लिहला.
आचार्य मोहनराजदादा आपल्या मनोगतात म्हणाले, मोठे कारंजेकर बाबा निघून गेल्याने आम्ही पोरके झालो. महानुभाव व संघाचे संबध स्व. दादाराव भडके यांच्यामुळे जुळले. ते पण आता निघून गेले. आमची नाळ जुळलेली आहे. संघ शक्ती पाठीशी असल्यामुळे काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळते. महानुभाव पंथ राष्ट्रहीतासाठी संघासोबत सदैव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भेटीच्या या छोटेखानी कार्यक्रमानंतर डॉ. मोहनजी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होती.