दारू तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड

    दिनांक :18-Jun-2019
नागपूर: मध्यप्रदेशातून छत्तीसगढमध्ये  विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असलेला मोठा मद्यसाठा नागपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोन वाहनांसह दोन आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून ४ हजार २५० बॉटल दारू जप्त केली आहे. विशेष म्हणजे बनावट आरटीओ क्रमांकाच्या वाहनांमधून ही दारू तस्करी केली जात होती.

 
 
मध्य प्रदेशातून छत्तीसगढ मध्ये अवैध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दारू साठा नेत असल्याची गुप्त माहिती नागपूर अबकारी विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे आबकारी चमूने सापळा रचून एका वाहनाला मानकापूर तर दुसऱ्या वाहनाला वंजारी नगर येथे ताब्यात घेतले. यावेळी वाहनातील इतर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. वाहनांची तपासणी केल्यावर त्यात मध्यप्रदेशात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एक महिंद्रा बोलेरो व एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. अजय बांते (वय ३४ वर्षे,राहणार वांजरीनगर,नागपूर) व नवज्योतसिंह धारिवाल (वय २१ वर्षे,राहणार दुर्ग,छत्तीसगढ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.