रेल्वे रुळावर आढळला मुलाचा मृतदेह

    दिनांक :18-Jun-2019
हिंगणघाट: काल सकाळी घरुन निघालेल्या पियुष रामगड़े या सोळा वर्षीय मुलगा रेल्वे रुळावर मृत आढळल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. काल सोमवारला सकाळी ६.३० वाजता शहरातील संत तुकडोजी वार्ड येथीलविठोबा नगरी परिसरातील रहिवासी असलेल्या रामगड़े परिवारातील धाकटा मुलगा आईला बाहेर जात असल्याचे सांगून घरुन निघाला. पियुषचा काल वाढदिवस असुनही दुपारपर्यंत घरी न परतल्याने आईला चिंता वाटायला लागली, आईने हि बाब हिंगणघाट येथेच राहणारे पियुषचे मामा शिक्षक सातपुते यांना कळविली. पियुष चे वडील गावी नसल्याने नातेवाईकांच्या मदतीने शोध घेण्यात आला.तेव्हा आज सकाळी वेणानदिवरील रेल्वे पुलाजवळ त्याची स्प्लेंडर बाइक आढळली, तेथे जवळपास शोध घेतला असता पियुषचा धड़ापासुन डोके वेगळे झालेला मृतदेह रेल्वे लाइनवर आढळला. पियुष हा नुकताच ज्ञानदिप विद्यालयातून दहावी पास झाला असून विज्ञान शाखेत ११ वी प्रवेश घेणार होता. पियुष चा मोठा भाऊ १२वी ला आहे.आई गृहिणी आहे, त्याचे वडील अमरावती येथे नाफेड फेडरेशनमधे कार्यरत आहे.ते कार्यालयीन कामकरिता मुम्बई येथे गेले होते. ते आजच सकाळी हिंगणघाटला परतले पियुषचा मृत्युचे कारण अजूनही गुलसत्यात असून त्याच्या मृत्युने शहरात शोककळा पसरली आहे.