शेतीला जोड बिजोत्पादनाची

    दिनांक :19-Jun-2019
हल्ली प्रसारमाध्यमांमुळे आणि शेतकर्‍यांच्या जागरूकतेमुळे सुधारित तसंच संकरित वाणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी धान्य उत्पादनासोबत शेताच्या काही भागात बीजोत्पादन घेतलं तर निश्चित अधिक आर्थिक फायदा मिळवणं शक्य होणार आहे. त्यादृष्टीने बीजोत्पादनापूर्वी काय करावं याची माहिती घेऊ. 

 
  1. सुधारित आणि संकरित वाणांचं, शुद्ध दर्जेदार चांगल्या प्रतीच्या बियाण्याचे बीजोत्पादन घेण्यासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेनं ठरवून दिलेल्या प्रमाणकांची माहिती असणं आवश्यक आहे.
  2. बीजोत्पादन घ्यावयाचं ते क्षेत्र ज्या पिकाचं बीजोत्पादन घ्यावयाचं आहे त्या पिकासाठी प्रमाणीत केलेल्या अंतराएवढं इतर जातींपासून विलग असावं.
  3. बीजोत्पादन घ्यावयाचं पीक पूर्वी त्या क्षेत्रात घेतलेले नसावे.
  4. बीजोत्पादन घ्यावयाचं त्या भागात येणार्‍या पिकांचीच शक्यतो बीजोत्पादनासाठी निवड करावी.
  5. नोंदणीसाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता ठेवावी.
बियाणे कायद्यातील कलम 9 नुसार कोणत्याही शेतकर्‍याला बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसात बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणं आवश्यक असतं. यासाठी विहीत नमुन्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकार्‍याकडे नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करावा. यामध्ये बिजोत्पादनाची प्रक्रिया, विक्री व्यवस्था, साठवण या सर्व गोष्टीकडे बिजोत्पादकाला लक्ष पुरवावं लागतं.
 
त्याचप्रमाणे प्रक्रिया, विक्री यासारख्या मुलभूत सोयी-उपलब्ध नसतील अशा शेतकर्‍यांनी राज्य बियाणं महामंडळ, राष्ट्रीय बियाणं मंडळ किंवा खाजगी बियाणं कंपन्यांकडे नोंदणी केल्यास त्यांच्यासाठी शेतकर्‍यांना बीजोत्पादन करता येऊ शकतं. यामध्ये बीजोत्पादनासाठी लागणारं बियाणं, त्याची नोंदणी, परीक्षण य बाबींमध्ये महामंडळ किंवा कंपन्यांची मदत होते.