प्रक्रिया उद्योगाचा आधार

    दिनांक :19-Jun-2019
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करता भारतात अन्नप्रक्रियेला मोठा वाव आहे. सशक्त अन्न तंत्रज्ञान उद्योग उभा राहिल्यास परंपरागत शेतीचे तंत्र बदलेल. ती व्यापारक्षम होईल. शेतमालाचे मूल्यवर्धन होण्याबरोबरच रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि निर्यातीला चालना या बाबीही साध्य होतील. शहरातील वाढते उत्पन्न, तरुणांची अधिक संख्या आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे प्रक्रियायुक्त अन्नाची मागणी वाढत आहे. गुणवत्तापूर्ण स्वच्छ आणि सहज उपलब्ध होणार्‍या प्रक्रियायुक्त अन्नाचा खप वाढला आहे. ताज्या आणि नाशवंत शेतमालापासून प्रक्रिया अन्नाची निर्मिती अपेक्षित आहे. पण ताजा माल आणि त्यापासून तयार होणारे प्रक्रियायुक्त अन्न यांच्या दरात मोठी तफावत पडते. या पदार्थांची विक्री परवडणार्‍या दरात केल्यास मागणी वाढू शकते. 
 
 
या उद्योगासाठी पूर्वापार चालत आलेल्या वाटा पुन्हा नव्याने हाताळाव्या लागणार आहेत. शहरी व्यक्ती मॉलमध्ये जाऊन पॅकिंग केलेले धान्य आणि खाद्यपदार्थ विकत घेताना दिसतात. त्याच बरोबरीने या ठिकाणी वेगवेगळा भाजीपाला तसेच पदार्थांची प्रक्रियायुक्त पावडरही उपलब्ध होत असते. त्यातही भाजीपाल्याच्या पेस्टला अधिक मागणी आहे. अर्थात अशा पेस्टच्या निर्मितीमागचे तंत्रज्ञान बरेच खर्चिक आहे. शिवाय ही पेस्ट अधिक काळ चांगली राहीलच असे सांगता येत नाही. त्यातच अलीकडे ‘रेडी टू इट’किंवा ‘रेडी टू कूक’ ही पाश्चिमात्य राष्ट्रात दिसणारी संकल्पना आपल्याकडेही रूढ होत आहे. त्यादृष्टीने शिजवण्यास सोपे तसेच तयार खाद्यपदार्थ उपलब्ध झाल्यास बराच फायदा मिळू शकतो.
 
पूर्वी महिला पालेभाज्याकिंवा इतर अन्नपदार्थ ऑक्टोबर हीटमध्ये किंवा एप्रिल-मेमधील तीव्र सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वाळवून ठेवत असत. परिणामी, हे अन्नपदार्थ वर्षभर चांगले टिकत असत. याच तंत्राचा वापर करून आजही अधिक काळ टिकणारे अन्नपदार्थ तयार करता येतील. हळद, मिरची, कांदा, कढीपत्ता, लसूण यांच्या पावडरचीही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व पदार्थ वाळवून त्याची पावडर करावी. थोडी-बहुत प्रक्रिया केल्यास ती बराच काळ टिकते. त्यासाठी वेगळे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागत नाहीकिंवा अधिक खर्चही येत नाही. अशा प्रकारच्या पावडरच्या स्वरूपातील पदार्थांना किराणा दुकानामध्ये तसेच मोठमोठ्या मॉल्समध्ये बरीच मागणी आहे.
 
विशेष म्हणजे अशा पदार्थांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चिंचेची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, कांदा पेस्ट या उत्पादनांना चांगली मागणी आहे. हे सर्व पदार्थ ग्रामीण महिलांना घरबसल्या तयार करता येण्यासारखे आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक ठिकाणीच उपलब्ध होत असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो. शिवाय या पेस्टची प्रक्रिया सोपी आहे. ग्रामीण भागात अजूनही मजुरीचा दर बराच कमी आहे. त्यामुळे या वस्तुच्या निर्मितीचा खर्च कमी राहतो. परिणामी, त्या कमी दरामध्ये निर्माण करणे शक्य होते.
 
अलीकडे शहाळ्याचे पाणीही 200, 250 मिलीग्रॅमच्या पाऊचमध्ये उपलब्ध केले जाते. त्याची मागणीही वरचेवर वाढत आहे. अशा प्रकारच्या ग्रामीण उद्योगातील महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता, चव, रंग आणि आर्द्रता याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. या उत्पादनाची बाजारपेठेतील मागणी या गुणांवरच टिकून राहते. खाद्यपदार्थांबरोबरच विविध फळांच्या पावडरलादेखील आईस्क्रीम उद्योग, औषध-सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेद उद्योगाकडून मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, स्ट्रॉबेरी, केळी, चिकू, सिताफळ, संत्रा, लिंबू, सफरचंद या फळांच्या पावडरला प्रथम पसंती दिली जाते.
 
याबरोबरच खाद्यरंगाच्या निर्मितीलाही भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता ग्रामीण भागातील महिलांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी देताना तसेच उद्योजकांना चांगला नफा मिळवून देताना हा प्रक्रिया उद्योग अधिक विस्तारणे गरजेचे ठरणार आहे. त्यातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेलच शिवाय, शेतीव्यवसायालाही आर्थिक गर्तेतून बाहेर काढणे शक्य होईल.