शाब्बास शाकिब...

    दिनांक :19-Jun-2019
थर्ड ओपिनियन...
मिलिंद महाजन
डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज 32 वर्षीय शाकिब उल हसन आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला. बांगलादेशने वेस्ट इंडीजविरुद्ध 51 चेंडू शिल्लक ठेवून 7 गड्यांनी विजय नोंदविला. विश्वचषकाच्या इतिहासात विजयासाठी यशस्वी धावांचा पाठलाग करण्याच्या विक्रमापैकी हा एक विक्रम आहे. शाकिब उल सहनच्या नाबाद 124 धावांची दिमाखदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने 42 षटकांपेक्षाही कमी षटकात 3 बाद 322 धावा काढून विजयाचे लक्ष्य साधले. शाय होप, इविन लेविस व शिमरॉन हेटमायर यांनी अर्धशतके झळकावलीत, परंतु ती सर्व वाया गेली.

 
शाकिब अल हसन व लिटन दासने संयमाने विंडीजच्या आक्रमक मार्‍याला तोंड देत बांगलादेशला प्रशंसनीय असा विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 189 धावांची अभेद्य भागीदारी केली. शाकिबने 170 मिनिटे खेळपट्टीवर विंडीजच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याने 99 चेंडूत 16 चौकारांसह नाबाद 124 धावांची आकर्षक खेळी केली. लिटन दासनेही त्याला उत्तम साथ देत बांगलादेशच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. लिटन दासने 69 चेंडूत 8 चौकार व 4 षट्‌कारांसह नाबाद 94 धावांची दिमाखदार खेळी केली.
 
शाकिबने विश्वचषकात महान खेळापैकी एक अशी मोठी खेळी केलेली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या विजयासाठी धावांचा पाठलाग करताना तो सर्वाधिक योगदान देणारा खेळाडू ठरला. तसेच महमुदुल्लाहनंतर विश्वचषकात दोन शतके झळकाविणारा खेळाडू ठरला. विश्वचषकात बांगलादेशचा सर्वाधिक धावा काढणारा खेलाडू ठरला. शिवाय या शतकी खेळीबरोबरच तो वन-डे क्रिकेटमध्ये 6 हजार धावांवर पोहोचणारा खेळाडूसुद्धा ठरला. एवढेच नव्हे तर विश्वचषकात बांगलादेशच्या आतापर्यंतच्या सहा शतकी भागीदारींच्या यादीतही त्याचे नाव नोंदले गेले आहे. लिटन दासची त्याला उत्तम साथ मिळाली. लिटननेही विश्वचषक पदार्पणात अर्धशतक झळकावून आपली निवड सार्थकी ठरविली.
 
याशिवाय शाकिब अल हसनने आपल्या फिरकीचीही कमाल दाखविली. त्याने इविन लेविस व निकोलस पुरन या दोन महत्त्वपूर्ण गड्यांना बाद करण्यात यश मिळविले. बांगलादेशने यापूर्वी विश्वचषकात 2015 मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात 319 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय नोंदविला होता आणि सोमवारी टाऊंटन येथे वेस्ट इंडीजने विजयासाठी ठेवलेले 322 धावांचे आव्हानही पूर्ण केले. 2011च्या विश्वचषकात आयर्लण्डने इंग्लंडच्या 328 धावांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देत विजयाचे लक्ष्य साधले होते.
 
शाकिब अल हसन व लिटन दास यांनी विंडीजविरुद्ध चौथ्या गड्यासाठी केलेली 189 धावांची अभेद्य भागीदारी विश्वचषकातील बांगलादेशची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाकिब व मुस्तफिजूर रहिमने तिसर्‍या गड्यासाठी 142 धावांची, 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध महमुदुल्लाह व मुुशफिकूरने पाचव्या गड्यासाठी 141 धावांची, तर स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात तमिम इक्बाल व महमुदुल्लाहने दुसर्‍या गड्यासाठी 139 धावांची आणि अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात शाकिब व मुशफिकूरने पाचव्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली होती.
 
वास्तविक पूर्ण तयारीनिशी बांगलादेशचा संघ विश्व स्पर्धेत उतरला आणि सुरुवातही धमाकेदार केली. दक्षिण आफि‘केला पहिल्याचसामन्यात 21 धावांनी हरविले. त्यांच्या 330 धावांच्या प्रत्युत्तरात फ्ििफ‘केला 309 धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र न्यूझीलंडविरुद्ध त्यांना दोन गड्यांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 244 धावा उभारल्या आणि न्यूझीलंडने 2 गडी राखून विजयाचे लक्ष्य साधले. तसे पाहता यंदाच्या विश्वचषकात बांगलादेशवर पावसाने अन्यायच केला. पावसामुळे त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा सामना रद्द झाला आणि एकही चेंडू न खेळता एक-एक गुण घेण्यावर समाधान मानावे लागले.
 
वास्तविक दक्षिण आफि‘का आणि आता विंडीजविरुद्ध त्यांनी दिलेली झुंज पाहता बांगलादेशने श्रीलंकेला नक्कीच घाम सोडला असता आणि पूर्ण दोन गुण वसूल केले असते. असो असा पावसाचा तडाखा इतर अनेक संघांनाही बसला आहे. तरीही बांगलादेश अजूनही स्पर्धेत आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया (8), न्यूझीलंड (7), भारत (7) आणि इंग्लंड (6) यांच्यानंतर बांगलादेश 5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी अजून लढायचे आहे...