ICCWorldCup2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, पंतला संधी मिळणार

    दिनांक :19-Jun-2019
लंडन,
इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले आहे. आधी तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल, असे सांगण्यात आले होते, मात्र दुखापत गंभीर असल्याने धवनला संपूर्ण विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात कायमस्वरुपी स्थान मिळाले आहे. धवनच्या जागी आता केएल राहुल टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करणार आहे.
 
 
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. मात्र अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
या सामन्यात दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर नॉटिंग्घममध्ये झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र अजूनही ही दुखापत भरुन न निघाल्याने शिखर संपूर्ण विश्वचषकातच खेळू शकणार नाही.
शिखर धवनने आयसीसीच्या टूर्नामेंट्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. शिखर धवनने 2015 च्या विश्वचषकात 51.50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहे, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013-2017) मध्येही धवनची कामगिरी चांगली होती. त्याने 77.88 च्या सरासरीने तीन शतकांच्या मदतीने 701 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात देखील शिखरने ऑस्ट्रेलियाविरुध्द 117 धावांची करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल. तसंच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली होती.