आपण आणि आपले गावपण...

    दिनांक :19-Jun-2019
यथार्थ  
 
 श्याम पेठकर 
 
 
‘‘तू ज्या महानगरात राहतो, ते महानगर नसून तो एक महाअजगर आहे. त्यात तू, तुझं घर, सुंदर घरंदाज बायको आणि गोंडस बाळ सुरक्षित, जिवंत आहात, असं तुला वाटतं. पण, या महाअजगराच्या पोटात कुणीच शिल्लक नाही. त्याची भूकही मोठी असल्याने तो मिळेल ते गिळत चाललाय्‌...’’ गावाकडून भावाच्या आलेल्या पत्रातला हा संदर्भ केविलवाणा आहे, बोचरा आहे, पण सत्य आहे. म्हणून तो नाकारताही न येणारा आहे. जे स्वीकारणं कठीण, अंगीकारणं महाकठीण आणि नाकारणं अशक्य असतं, त्यालाच सत्य म्हणतात. वर्तमानात सत्याची फक्त कटु चवच अनुभवायला मिळते. तसंही आपल्या जीवनात दीडच सत्य आहे. मृत्यू हे पूर्ण सत्य आणि भूक हे अर्धसत्य. पूर्ण सत्यापासून दूर पळताना आपण अर्धसत्यात गुरफटत जातो आणि मग गाव सोडावा लागतो. भुकेला मर्यादाच नसतात. भूक कशाचीही आणि कितीही असू शकते. क्षुधाशांतीसाठी परागंदा झालेल्या जिवांची वखवखलेली गर्दी म्हणजे शहर. अर्धसत्याच्या नादी लागून शहरात आलेल्या प्रत्येकाच्या मनात ‘गाव’ नावाची हिरवी जखम असते. मग पाऊस पडला अन्‌ हिरवळ डोकावू लागली की, गावाची आठवण अशा दुखर्‍या जिवांच्या मनात रिमझिमत राहते...
 

 
 
प्रत्येकालाच आपलं एक गाव असतं. त्या गावात त्याचं काय अस्तित्व असतं, या मोजमापाला या गावाशी आपलेपणा असण्यात काहीच थारा नसतो. गावकुसावर उपेक्षांच्या अपेक्षित झावा सहन करीत, उभ्या झोपडीत राहणार्‍यांचंही गाव असतं आणि पिढ्यान्‌पिढ्या गावावर एकछत्री अंमल करणार्‍या चिरेबंदी वाड्यातल्या मानवाईकांचंही गाव असतं. गावाच्या आठवणींची हिरवी जखम कुरवाळतच प्रत्येक ‘गावकरी’ शहरात राहतो. मग पाऊस पडला की, गावस्मृतींचा हिरवा गावगंध दरवळायला लागतो. हा गंध फक्त दुसर्‍या गावकर्‍यालाच जाणवतो. या गंधाला ‘जिवाभावा’ची जोड असते. असे गावगंधाळलेले जीव ‘मैत्रजीवां’चे होऊन जातात. खरेतर भुकेच्या सावलीत शहरात जगणार्‍यांचं जीवनसत्त्वच असतं गाव. प्रत्येकाच्या मनात गाव जिवंत असतं, तोवर तो नवनिर्मितीची क्षमता राखून असतो. आयुष्याच्या सगळ्याच व्यथा गावाच्या इंद्रायणीत तरून जातात. माणूस कितीही थोराड झाला, तरी गावाच्या आठवणींची जास्वंदी डहाळी आपले कोवळेपण जपून असते.
तुक्याच्या अभंगातून, नदीच्या खळखळाटातून, श्रावणधारांतून गाव आपल्याला भेटत असतं. महानगरातही कधीकधी दूरवरून टाळ-चिपळ्यांचे आवाज येतात. मृदंगावरचा भजनी ठेका वार्‍यावरून वाहत येतो... मनाच्या तळघरातून डेबुजीचा पहाडी आवाज घुमतो- ‘‘गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपालाऽऽऽ.’’ डेबुजी कधी भेटला नाही, पण जिवांना भेटीचं प्रयोजन असतं का? ती गरज शरीराची. गावाच्या मातीतून तो सरळ रक्तात उतरला असावा. वार्‍यावरून आलेली अशी भजनी साद गावातल्या मंदिराच्या गार गाभार्‍यात घेऊन जाते. मन हलकं होतं, काटसावरीच्या फुलागत आणि अलगद तरंगत गावात जाऊन पोहोचतं...
गावाच्या नदीकाठी गुलाबशेठची वाडी. आधी ही शंकर पाटलाची होती म्हणे. पद्धती, रीतरिवाज पाळण्यासाठी पाटील पदरमोड करीत आले आणि गावाच्या वाड्या ‘शेठ’च्या झाल्यात. नदीकाठची ती समाधी नेमकी कुणाची कळत नाही. पण माणसंच नव्हे, तर गोहनात गेलेली गुरंंही तिथे थांबतात. स्तब्ध. नदीकाठच्या रामाच्या मंदिरातून भल्या पहाटे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ची तान ऐकू येते. गावातली माय भल्या पहाटे उठून सुस्नात झालेली असते. तोंडानं देवाचं स्तोत्र सुरू असतं. तिच्या त्या नादमय प्रासादिक वावरण्यानंच जाग येते. उन्हाळ्यात परसदारी कडुिंनबाच्या झाडाखाली झोपले असताना जाग आली की, निंबाचं कडू झाडही गुणगुणायला लागलं असतं. अनेक हिरवे रावे लाल चोचींनी निंबोण्या लडिवाळपणे कुरतडून टाकताना नादमय हितगुज करीत असतात. शेजारचं मोगर्‍याचं झुडूप श्रीमंत झालं असतं. रात्र आपल्या चांदण्या त्या झाडाच्या स्वाधीन करून गेली की काय असं वाटावं, इतकी शुभ्र मोगर्‍याची टवटवीत फुलं उमलली असतात. नदीवर बायांची धुणी सुरू असतात. चाळ, बांगड्या आणि कपड्यांच्या आपटण्याने होणार्‍या नादातून कपडे धुणारीच्या कमनीय हालचाली मोहून टाकतात. नदीचं पाणी कपड्यांचा मळ शोषून घेतं अन्‌ माणसाची मनंही निरभ्र करतं. नदीकाठी कपडे धुणार्‍या ललना मर्यादांच्या सौंदर्यानं सामर्थ्यवान झालेल्या असतात. नदीच्या पाण्यात पुरुषाची सावलीही पडली तरी त्या सावरतात.
माझी लाजरी शेेवंता। धुनं ओनव्यानं धुते।
सूर्या पाहून पान्यात। थे पदर सावरते।।
गावाच्या नदीचं पाणी ऐन पौषातही उबदार असतं. रात्री मायच्या कुशीत झोपून सकाळी अंग माय नदीच्या पाण्यात झोकून द्यावं... मायनं भल्या पहाटे येऊन आपली माया या नदीच्या पाण्यात सोडून दिली का? गावाची नदीही नेहमीच मायच्या मायेनं कवटाळते. माय नसते नंतर, पण नदी मात्र असते.
गावाच्या दक्षिणेला मशिदीवर पहाटेच्या संधिप्रकाशात अजानीचे आर्त स्वर निनादले की, भक्तिभावाच्या लहरींवर स्वार होऊन गाव जागं होतं. चोचीत चोच घालून पाखरंही गलका करतात. रामप्रहरी गाईच्या गळ्यातील घंट्यांच्या किणकिणाटाने गावाचं गोकुळ होतं. शेताच्या बांधावर ओंजळीत मावतील अशी पिटुकली काळी पाखरं दवभिजले गवताचे दाणे टिपतात. हळूहळू गाव पूर्ण जोशात नांदू लागतं. गावाला केवळ जमीनच नसते. जेवढी गावाची जमीन असेल, तितकंच गावाचं आभाळ असतं. गावजमिनीला कवेत घेण्यासाठी आभाळ दूरवर कुठेतरी वाकलं असतं. गावाच्या न्हात्याधुत्या पोरींच्या अस्तित्वात गावाच्या सोज्ज्वळ संपन्नतेचा दरवळ असतो. अजान ऐकून जागं झालेलं गाव संध्याकाळच्या आरतीला मंदावतं. सायंकाळी गोठे वासरांच्या बंड धडपडीनं गजबजले असताना, कौलारू घरांवर भुकेचा धूर रेंगाळत असतो...
गाव आठवलं की अवघ्या अस्तित्वाची झांज होते आणि थरथरत झंकारत राहते. गावाच्या वाटेवर आपलं बालपण भेटतं... पाखरांमागे धावणारं, नदीत पायाखालची वाळू चुरचुरत वाहून जाताना गुलूगुलू हसणारं, चौकीदाराची चाहूल लागताच पळताना पडलेली एकच कैरी अजूनही हळहळायला लावते. उपरण्याचं जाळं करून नदीत मासोळ्या पकडताना पाण्यासोबत मासोळ्याही निसटून जाव्यात, तसे हे क्षण निघून जातात...
जीवनातला पहिला वसंतही गावातच भेटतो. आरती म्हणणारे ओठ प्रेमाची गाणी गाऊ लागतात. स्तोत्र गझल होतात... गावदेवीच्या पाऊलवाटेवर अमलताशची पिवळीजर्द तोरणं लटकलेली आणि वाट गुलमोहराच्या फुलांनी डवरलेली. सायंकाळी फुलांची परडी घेऊन ती तिथे येते. लहानपणी एकच कैरी ‘चिमणीच्या दातांनी’ तोडून खाल्ल्याची आठवण तिच्याही डोळ्यांत ताजीच. जाताना ती चुकल्यासारखं करून प्रसादाऐवजी मोगर्‍याची दोन फुलं हातावर ठेवून जाते. गावकीचा आदर करत तिचं व्यक्त होणं इतकं मुग्ध, अबोल.... तेव्हा रानात कृष्णाचा पावा वाजत असतो! हे क्षण इतकेच आणि एवढेच, कैरीसारखे! ते तसेच असावेत, फुलपाखराच्या मिटलेल्या पंखासारखे.
...मिटल्या डोळ्यांनी आत आत खूप खोल दिसणारं गाव आता तसंच राहिलं नाही. गावाला आता पाऊलवाट राहिली नाही. रस्ते झालेत. नदी आटली आहे; विटाच्या भट्ट्यांनी फाटली आहे. लाजरी शेवंता आता कापूस नाही वेचत, पुलाच्या कामावर जाते. तिला सारीच लाज सोडावी लागली आहे. मगनशेठचा बीअरबार, गार्डन रेस्टॉरंट सतत भरलेलं असतं. गावाची आदर्श शाळा कॉपीचा अड्डा झाली आहे. गुरुजींचा मुलगाच आता मटक्याच्या पट्ट्या फाडतो आणि रामाचं मंदिर उदासलं आहे. नदी पावसाळ्यातही उफाणत नाही आणि शेतं पिकत नाही. नदीची वाळू, परमिट घेऊन विकून टाकली लोकांनी आणि शेताचे प्लॉट पडत आहेत. अजान ऐकून गावकरी अस्वस्थ होतात. पाटील आमदार झालेत, चिरेबंदी वाडा गजबजला. पण झोपड्यांशी त्यांचा संबंध राहिला नाही; आणि सगळ्यात भीषण म्हणजे आता गावाला आभाळही राहिलं नाही...
एक गाव मनातलं उभं करायचं.
गाव, थिल्लर नसलेलं, चिल्लर नसलेलं.
गावात तलवारींची वाण नसावी;
गावात बेकारांची घाण नसावी
गावात नसावा विद्वानांचा लाचार ताफा
गावाने जमवून ठेवावी सुकी लाकडे, ऐन पावसाळ्यात कुणी मेलेच तर...
गाव खातेपिते असावे
गावाने घालू नये आळश्यांना गावभोजन
हाकावा डांगोरा, पिटावा नगारा.
गावात कुणी उपाशी आहे का, हे गावाने बघावे. मग गावाने जेवावे...
एक असं गाव शहरात अडकल्या ‘गावकर्‍यां’नी निर्माण करावं. पण, त्यासाठी गावाने गावाबाहेरचे गोटे आणून त्यांना स्वत:पेक्षा मोठं करणं थांबवायला हवं!