‘बाहुबली’ सीरिजमध्ये सोनाली

    दिनांक :19-Jun-2019
‘बाहुबली’नं भारतीय मनोरंजनसृष्टीची गणितंच पार बदलून टाकली. या सुपरडुपरहिट चित्रपटावर आधारित एक वेबसीरिज लवकरच येतेय. या वेबसीरिजमध्ये काही मराठी कलाकारही दिसणार असून, अभिनेत्री सोनाली खरे हे त्यातलंच एक महत्त्वाचं नाव. नेहमी ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसणारी सोनाली यात पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ती स्वतः त्यामुळे खूप उत्साही आहे.

 
आपल्या भूमिकेबाबत सोनाली म्हणाली, ‘माझ्या भूमिकेबद्दल मला आता फार काही सांगता येणार नाही; पण आजवर मला ग्लॅमरस आणि पाश्चात्त्य लूक असलेल्या भूमिकाच मिळाल्या होत्या. या सीरिजमध्ये भारतीय स्त्रीची भूमिका साकारायला मिळाली याचा मला आनंद झाला. गेली काही वर्षं मला अशा प्रकारची भूमिका करायला मिळाली नव्हती. फक्त ग्लॅमरस भूमिकांतच नव्हे, तर पारंपरिक भारतीय भूमिकांमध्येही मी चांगली दिसू शकते अस मला वाटतं. ‘बाहुबली’ सीरिजच्या टीमनं माझ्यात ही भूमिका पाहिली याचा आनंद आहे. फक्त ग्लॅमरसच नव्हे, तर वेगळ्या भूमिकांमध्येही मी चांगलं काम करू शकते. मराठी चित्रपटांमध्येही मला अशा पद्धतीच्या भूमिका साकारायला आवडतील. यापुढे ग्लॅमरस भूमिकांच्या पलीकडे जाऊन वेगळ्या भूमिकांसाठी विचारणा होईल असं मला वाटतं.’या सीरिजबाबत ती म्हणाली, ‘बाहुबलीची सुरुवात आणि त्यानंतर काय होतं हे दुसऱ्या भागात पाहायला मिळालं; पण आमच्या या सीरिजमध्ये या सगळ्याच्या आधी काय घडलं आहे हे दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी हैदराबादला मोठा सेट उभारण्यात आला आहे. राजामौलीच या सीरिजचं दिग्दर्शन करताहेत. ही संपूर्ण सीरिज एका वेब माध्यमावर दाखवण्यात येईल. सध्या पहिल्या सीझनचं चित्रीकरण सुरू आहे. याचे अनेक भाग असतील.’