‘ते’ ट्वीट व्यंगात्मक होते : महिला आयएएसचे स्पष्टीकरण

    दिनांक :02-Jun-2019
गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही 

 
 
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
महात्मा गांधींचा फोटो नोटांवरुन काढा, पुतळे पाडा, थँक्यू गोडसे…’ अशा अर्थाचे वादग्रस्त ट्विट करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आणि सनदी अधिकारी निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आपल्या ट्विटमुळे नवा वाद सुरू झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे. 
 
 
ट्विटद्वारे त्यांनी दुसरे ट्विट करुन स्वतःची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. ‘तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते. आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता.’ असे त्यांनी म्हटले आहे.  
 
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत ट्विट करणाऱ्या महिला आयएसएस अधिकारी निधी चौधरींना सेवेतून तातडीने बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली असून १७ मे रोजी निधी चौधरी या आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते.
 
 
आपल्या ट्विटमध्ये निधी चौधरी यांनी, ‘महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती उस्तवाबाबतच्या तयारीबाबत नाराजी व्यक्त करतानाच आपण गांधीजींचे चालनावरील छायाचित्र हटवावे, तसेच त्यांचे जगभरातील पुतळे देखील हटवावेत आणि त्यांचे नाव देण्यात आलेल्या संस्था आणि रस्ते यावरूनही त्यांचे नाव हटवण्यात यावे.’ अशी इच्छा व्यक्त केली होती. निधी यांनी आपल्या ट्विटच्या अखेरीस गांधींची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे याचे आभार देखील मानले होते.