महामंडळ जोपासत आहे सामाजिक बांधिलकी

    दिनांक :02-Jun-2019
एसस.टी.बसचा 71 वा वर्धापनदिन साजरा
शेगाव-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेली अनेक वर्षापासून राज्यभर चांगल्याप्रकारे बससेवा पुरवत आहे. तसेच शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व्यक्ती, अधिस्विकृतीधारक पत्रकार, शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती कलावंत या घटकांना प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलत देऊन सामाजिक बांधिलकी महामंडळ जोपासत आहे. तसेच महामंडळ कडून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य तसेच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो असे प्रतिपादन नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच यांनी बोलताना केले. येथील बसस्थानकावर शेगाव एसटी आगारातर्फे आयोजित 71 व्या वर्धापन दिनानिमीत्य अयोजीत कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक ह.भ.प ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश दळवी, नगरसेवक दिनेश शिंदे, शैलेश पटोकार, प्रफुल्ल ठाकरे, काँग्रेसचे मोतीराम खवले, प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष राजेश चौधरी एस.टी.चे पालक अधिकारी थोरवे व शेगाव एस टी आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे आदींची याप्रसंगी मंचावर उपस्थिती होती.
प्रथम एसटीच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवशाही बसचे पूजन नगराध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले. डेपो मॅनेजर भिवटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अविनाश दळवी ह.भ.प.ज्ञानेश्वर मिरगे, पीएसआय इंगोले यांनी उपस्थित एस टी अधिकारी कर्मचारी व प्रवाशांना मार्गदर्शन केले. अविनाश दळवी यांनी एसटी महामंडळ मार्फत अनेक वर्षांपासून प्रवाशांना प्रवास व अन्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना शासनाने सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे. रेल्वे कर्मचार्‍यांप्रमाणे एसटीच्या कर्मचार्‍यांना सुद्धा सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात याव्यात. त्यांचे वेतन वाढविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून अशी मागणी आपण भविष्यात महामंडळ अध्यक्ष ना.दिवाकर रावते यांचेकडे करू असे सांगितले तर मिरगे यांनी सगळ्यांनी शासन महामंडळ सर्व समाजातील सर्व घटकांना विविध प्रवास सवलतीचे माध्यमातून चांगली सोय सेवा देत आहे असे सांगितले. संचलन व आभारप्रदर्शन लिपिक ख्वाजाखान यांनी केले. कार्यक्रमाला एस.टी. आगाराचे वाहतुक निरीक्षक ए.जी.मुसळे, बसस्थानकप्रमुख अशोक देशमुख, कर्मचारी जतकर काका, एस टी कँटीन संचालक प्रशांत खत्री व अन्य कर्मचारी चालक वाहक प्रवाशी उपस्थित होते. शेवटी नगराध्यक्ष यांचे हस्ते वर्धापन दिनानिमित्त उपस्थित प्रवाशी व कर्मचारी यांना मिठाई वितरित करण्यात आली.