देशभरातील ८४ विमानतळांवर २०२० पर्यंत बॉडी स्कॅनर

    दिनांक :02-Jun-2019
नवी दिल्ली, 
सध्या वापरले जाणार्‍या मेटल डिटेक्टरच्या चौकटी, हाताने वापरले जाणारे स्कॅनर्स आणि श्वानांचा वापर बंद करून मार्च 2020 पर्यंत देशभरातील 84 विमानतळांवर बॉडी स्कॅनर यंत्रणा स्थापित करा, असे आदेश केंद्र सरकारने दिल्याचे अधिकृत दस्तावेजावरून स्पष्ट झाले आहे.
सध्या वापरल्या जाणार्‍या मेटल डिटेक्टर्सच्या माध्यमातून धातुरहित शस्त्रे आणि स्फोटके शोधली जाऊ शकत नाहीत. मात्र, बॉडी स्कॅनरचा वापर झाल्यास शरिरावर लपवलेली धातूची आणि धातुरहित शस्त्रे सहजपणे शोधणे शक्य आहे, असे नागरी उड्डयन सुरक्षा विभागाने एप्रिलमध्ये देशभरातील सर्व विमानतळांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
 

 
 
बॉडी स्कॅनरच्या वापरासाठी जारी करण्यात आलेल्या मानक कार्य पद्धतीचा वापर या 84 विमानतळांनी करणे आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे. देशभरात सध्या सक्रिय असलेल्या 105 विमानतळांपैकी 28 विमानतळे अतिसंवेदनशील आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई तर, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील संघर्षग्रस्त भागातील 56 विमानतळांचा संवेदनशील श्रेणीत समावेश आहे.
देशभरातील 28 अतिसंवेदनशील आणि 56 संवेदनशील विमानतळांनी मार्च 2020 पर्यंत बॉडी स्कॅनर यंत्रणा स्थापन करावी, तर उर्वरित विमानतळांनी मार्च 2021 पर्यंत ही यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.