म्हाडाची सोडत जाहीर; २१७ जणांना मिळाली घराची किल्ली

    दिनांक :02-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम
मुंबई,
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) २१७ घरांसाठीची सोडत जाहीर झाली असून राशी कांबळे या सोडतीच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. तर, दीनानाथ नवगिरे हे दुसरे मानकरी ठरले आहेत. म्हाडाच्या वेबसाइटबरोबरच फेसबुकवरही या सोडतीचे निकाल पाहता येणार आहेत. 

 
म्हाडाच्या २१७ घरांसाठीची संगणकीय सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. यात एकूण २१७ जण भाग्यवान विजेते ठरले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २१७ घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीस नेहमीप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद लाभला. या घरांसाठी ६६,०९१ जणांनी अर्ज दाखल केले होते. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकारनगर, चेंबूर येथील १७० व मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ घरांचा समावेश होता. यांसाठी अल्प उत्पन्न गटासाठी ५३,४५५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२,६३६ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे १०६ कोटी आणि ३७ कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली.
सोडतीसाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला असून, त्याची आसनक्षमता १,२०० इतकी आहे. मंडपात तीन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सोडतीला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित आहेत. अर्जदारांना सोडतीसाठी मुख्यालयात येण्यास लागू नये यासाठी म्हाडाच्या वेबसाइटप्रमाणेच फेसबुकवरूनही सोडतीचे थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या वेबसाईटवर पाहता येईल.
सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षायादीवरील अर्जदारांची नावे https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जातील.