ट्रकखाली चिरडून चिमुकलीचा मृत्यू, जमावाने केली ट्रकचालकाची हत्या

    दिनांक :02-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
नागपूर,
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकचालकाला मारहाण केली, यात त्याचाही मृत्यू झाला. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सांगली-हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. यामुळे सांगली-हरिपूर रोडवर मध्यरात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सांगली शहर पोलिसात नोंद झाली आहे.
 
 
ऋचा सुशांत धेंडे असे  मृत चिमुकलीचं नाव. सांगली- हरीपुर रस्त्यावरील काळी वाट येथे ऋचा आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होती. सांगली-हरिपूर रस्त्यावर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऋचा आपल्या काकासोबत दुचाकीवरुन घरी निघाली होती. चौकात वळण घेत असतानाच समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक दुचाकीला बसली. ट्रक चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने दुचाकीला उडविले. यात ऋचाचे काका दुस-या बाजूला फेकले गेले, तर ऋचा रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णलायात नेले असता तिला मृत घोषीत करण्यात आले.
दरम्यान, गाडीवरील नियंत्रण सुटलेल्या कुमार श्रीकांत आळगेकर (वय 45, रा. हरिपूर) या ट्रकचालकाने पुढे जाऊन आणखी एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर पुढे असलेल्या कमानीला जाऊन धडकला. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने ट्रकचालकाला बाहेर खेचलं आणि बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. या प्रकारामुळे सांगली- हरिपूर रोडवर तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजतात ग्रामीण व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला हटवून ट्रक चालकाला सांगलीत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सांगली शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.