कलबुर्गी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

    दिनांक :02-Jun-2019
बेळगाव,
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 
कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ ला हत्या करण्यात आली होती. त्याला आता दोन वर्षे होऊन गेली तरी तपास ठप्प आहे. कर्नाटक सरकार अजूनही आरोपींना पकडू शकलेले नाही. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त झाला आहे; किंबहुना हे तिन्ही खूनही एकाच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचाही संशय आहे; परंतु या तिन्ही खुनांचा सध्या तपास करणाऱ्या सीबीआय, एनआयए या तपास यंत्रणा व महाराष्ट्र शासन, कर्नाटक व गोवा शासन यांच्यामध्ये कसलाही समन्वय नाही.
कलबुर्गी आणि पानसरे यांचा खून एकाच पिस्तुलाने झाल्याचा संशय पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. त्यामुळे लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागल्यास त्यातून पानसरे यांच्या खुनाचीही उकल होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हुबळीचा गणेश मिस्कीन (वय २७) हा लंकेश यांच्या खुनावेळी मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून तो एसआयटीच्या अटकेत आहे. ज्या चौघांचा खुनातील सहभाग स्पष्ट होत आहे, त्यातील एक महाराष्ट्रातील असल्याचे समजते.
कर्नाटक एटीएसने प्रवीण चतूर या तरुणाला सहा महिन्यांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. आज एटीएसने चतूरला पुन्हा अटक केली असून त्याला धारवाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ‘ककोका’ कायद्यांतर्गत १२ जणांना अटक केली आहे. त्यातील पुरुषोत्तम वाघमारे याने पिस्तूल चालवल्याचा आरोप आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.