बद‘सुरत!’

    दिनांक :02-Jun-2019
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
 
महाराज सुरतेवर आक्रमण करण्यास निघाले हे आपण मागील लेखात बघितले. पौष शु. व्दितीयेला (6 डिसेंबर 1663) राजांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन देवाधिदेव महादेवाचे दर्शन घेतले. तिथून राजे गुजराथेकडे दौडत निघाले. इतक्या मोठ्या संख्येत सेना कुठे निघाली, याची शंका येऊ नये म्हणून आपण औरंगाबादेवर आक्रमण करायला निघालो आहोत, अशी हूल राजांनी उडवून दिली. आणि स्वतः मात्र जव्हार, रामनगरमार्गे सुरतची वाट धरली. तिकडे गुजराथ प्रांतात राजांनी अफवा उडवून दिली की मोहोबतखानाच्या आदेशानुसार पट्टणचे बंड मोडून काढायला आपण चाललो आहोत.
 
4 जानेवारीला राजे सुरतपासून 30 मैल अलीकडे घणदेवीला तर 5 जानेवारीला सुरतेच्या वेशीवर उधना येथे येऊन धडकले. सुरतमध्ये बातमी पोहोचली होती की मराठ्यांचा कुणी सरदार आला आहे. पण मग गुप्तचरांमार्फत समजले की कुणी सरदार नाही, तर स्वतः शिवाजी आला आहे. बातमी पक्की होती. आणि मग सुरतमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. राजांनी इनायातखानाला निरोप पाठवला की-‘‘ मी युद्ध करायला आलेलो नाही. मला फक्त खंडणी हवी आहे. तुमच्या शहरातील हाजी सय्यद बेग, वीरजी व्होरा व हाजी कासम या तीन मंडळींना माझ्यासोबत खंडणीसंबंधी वाटाघाटी करण्यास पाठवावे. तसे न झाल्यास मला नाईलाजाने शहरावर आक्रमण करावे लागेल.’’ 
 
 
पण इनायातखानाने राजांच्या निरोपाला उत्तर दिले नाही. वाट पहाण्यास उसंत नव्हतीच त्यामुळे नाईलाजाने महाराजांना शहरात शिरावे लागले. मराठ्यांनी व्यापार्‍यांना खंडणीसाठी आवाहन केले. त्यानुसार अनेकांनी खंडणी आणून दिली. त्यांना राजांनी त्रास दिला नाही. राजांचे स्पष्ट निर्देश होते की- जे खंडणी देतील त्यांना परत जाऊ द्या पण जे जे लोक प्रतिकार करतील त्यांना सोडू नका. पहिल्याच दिवशी मराठ्यांवर प्रतिहल्ला करण्याऐवजी इनायतखान किल्ल्यात लपून बसला. इतकेच नव्हे, तर जे व्यापारी त्याच्याकडे शरण मागायला आले होते त्यांच्याकडूनही खानाने प्रचंड लाच खाऊन त्यांना किल्ल्यात घेतले. पण स्वतः मात्र मराठ्यांंवर आक्रमण करण्याची त्याची हिम्मत झाली नाही.
 
डचांनी जो अहवाल सादर केला, त्यानुसार शिवाजीने निकोलस क्लोस्ट्रा या ग्रीक माणसाकडून खंडणीचा निरोप पाठवला. पण रोख रक्कम नाही, या सबबीखाली त्यांनी (डचांनी) स्वत:चा बचाव केला. ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर मराठी आसूड कडाडले. त्यांच्या शक्तीला विरोध करणे सर्वांच्या आवाक्याबाहेरचे होते. मराठे घरांमध्ये शिरले, तिजोर्‍या-कपाटे भराभरा तुटू लागली. खणत्या सुरू झाल्या, अमाप संपत्ती आपले माहेर सोडून सासरी जाणार्‍या नववधूसारखी घराबाहेर उभी होती. सासर होते स्वराज्य! सर्व घरांमधून बाहेर आलेली संपत्ती भराभर शिवाजीराजांकडे वळविण्यात येत होती. व्हॉलकार्ड इव्हर्सन हा इंग्रज लिहितो की- ‘शिवाजीचा तळ शहराबाहेर होता. त्याच्यासाठी तंबू नसून तो एका झाडाखाली बसला आहे व उन्हापासून बचावासाठी झाडाच्या आधाराने एक कापड तेवढे बांधण्यात आले आहे. राजासमोर संपत्तीचे ढीग येऊन पडताहेत. त्यातील मौल्यवान गोष्टी जसे- हिरे, मोती, सुवर्णमुद्रा इत्यादी वस्तू ठेऊन बाकी वस्तू तो (शिवाजी) गरिबांमध्ये वाटून देतो आहे.’’
 
इंग्रजांच्या ‘लॉयल मर्चंट’ या गलबताच्या नोंदवहीमध्ये पुढील हकीकत आली आहे- ‘एक माणूस राजांना भेटायला आला व काही महत्त्वाचे बोलायचे आहे असे म्हणून झपझप पाऊले टाकत राजांपुढे आला. आणि काही कळायच्या आत आपला लपविलेला खंजर उपसून राजांवर वार काढला. पण राजांचे अंगरक्षक सावध असल्याने त्यांनी लगेच तलवारीचा वार करून मारेकर्‍याचा हात हवेतच कापला व लगेच त्याचं मुंडकं उडवलं. पण तो इतक्या वेगात महाराजांवर चालून आला होता की मेल्यावरही त्याचा देह राजांवर जाऊन आदळला. त्या धक्याने राजे खाली पडले अन्‌ तो मारेकरी त्यांच्या अंगावर पडला. त्याचे रक्त राजांच्या कपड्यांवर उडाले. हे सगळं इतक्या वेगाने झाले की मराठ्यांना वाटले की राजे मारल्या गेले. अन्‌ खवळलेले मराठे तिथे उभ्या असलेल्या व्यापारी अन्‌ कैद्यांवर तुटून पडले. भराभरा त्यांनी लोकांचे हात व मुंडकी कापायला सुरुवात केली. पण राजे तात्काळ उठून उभे राहिले व मोठमोठ्याने ओरडून आपल्या लोकांना सांगू लागले की थांबा! मी जिवंत आहे.
 
मराठे थांबलेत, पण तोपर्यंत अनेक लोकांचे हात अन्‌ डोके उडविले गेले होते.’ अँथनी स्मिथ नावाचा इंग्रज फॅक्टर सुदैवाने त्यातून वाचला. तो लिहून ठेवतो की- ‘मराठ्यांनी चार डोकी व सव्वीस हात कापलेत. मराठ्यांचा तर विश्वासच होता की हा हल्ला इनायतखानाच्या सल्ल्यावरून झाला होता. ते बिथरले आणि शहरात शिरले व दिसेल त्या घराला आगी लावत सुटले. आग भराभरा पसरू लागली, पाहता पाहता अख्खी सुरत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या प्रचंड लोळांनी सुरतेला आपल्या विळ्ख्यात घेतले होते.’ इव्हर्सन म्हणतो- ‘सुरतेची परिस्थिती सैदन (सोडोम) किंवा ट्रॉय शहरासारखी झाली होती.
 
आगीचे लोट बघून इंग्रज, डच, पोर्तुगीज व्यापारीही घाबरले होते. मराठ्यांचे लक्ष आता इंग्रजांच्या वखारीकडे वळले. वखारीवर मराठे धावून गेले, तेव्हा तेथे जेमतेम 200 सैनिक व निवडक तोफा होत्या. त्यांच्या जोरावर इंग्रजांनी प्रतिकाराला सुरुवातही केली. त्यामुळे स्वाभाविकपणे मराठे अडकून पडले. त्यांनी झटपट माघार घेतली व शहराकडची वाट धरली. इंग्रजांनी स्वत:च्या या पराक्रमावर भाळून मोठमोठी पत्रे इंग्लंडला पाठविली. त्यांत स्वत:चा ढोल तर त्यांनी बडविलाच आहे पण शिवाजी किती क्रूर अन्‌ निर्दयी आहे, हे सुद्धा रंगवून सांगितले आहे. पण हे लिहितांना ते एक महत्त्वाची गोष्ट ते जाणूनबुजून विसरले की राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला मदत केल्यावर राजापूरची वखार महाराजांनी अक्षरश: खणून काढली होती. पण ही सुरत होती राजापूर नव्हे, इथे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लूट हस्तगत करणे हे लक्ष होते. त्यात इंग्रजांशी लढण्यात वेळ दवडण्यापेक्षा इतर व्यापार्‍यांकडून मोठी लूट सहजगत्या प्राप्त होणार होती. महाराजांची 8,000 फ़ौज इंग्रजांच्या 200 सैनिकांना घाबरली असे तर त्यांना म्हणायचे नाही ना? असो!
 
सुरत लुटीविषयी बोलतांना प्रमुख प्रश्न मनात येतो की ही लूट किती असावी. जॉन एस्कालिएटने सर थॉमस ब्राउनला जो वृत्तांत पाठवला, त्यानुसार प्रत्येक हमालाकडे हिरे, मोती, माणिके व मोहरांनी भरलेल्या 2-2 पिशव्या असे तीन हजार हमाल होते. एकटा वीरजी व्होरा हाच 80 लाखांचा मालक असल्याचे तो सांगतो. सुरतकर इंग्रजांनी 28 जानेवारी 1664 रोजी लंडनला पाठविलेल्या पत्रांत म्हटले आहे की- ‘आपले नुकसान फक्त एक हज़ार पौंड झाले आहे. अर्थांत इंग्रजांनी स्वतःच्या वरिष्ठांना पाठवलेले हे पत्र असल्याने स्वत:चे अत्यल्प नुकसान झाल्याचेच ते सांगणार.’ इव्हर्सनने नोंद करून ठेवली आहे की एका व्यापार्‍याला सुरतेतून निसटायचे होते पण सुभेदाराने त्यांस अनुमती दिली नाही. हा व्यापारी जेव्हा राजांच्या लोकांकडून लुटला गेला तेव्हा त्याच्याकडे काय मिळावे? राजांना त्याच्याकडून 30 पिपे भरून सोने मिळाले. याचा अर्थ की महाराजांना प्रचंड प्रमाणात संपत्ती प्राप्त झाली होती. पण सुरतेहून इराणला गेलेल्या एका पत्रामध्ये याचे उत्तर मिळते. उत्तर अर्थातच आश्चर्यचकित करणारे आहे. त्यात म्हटले आहे की- ‘सुरतची ही लूट एक करोडची असावी. असा दणदणीत आघात राजांनी केलेला होता. ही लूट एखाद्या लुटारूने केलेली साधी सरळ लूट नव्हती तर स्वराज्य संसाधनेसाठी एका योगी माणसाने नाईलाजाने उचललेले पाऊल होते. त्यामुळे या लुटीला एक नैतिकतेची किनारही होती.
 
कॅप्युचिन कमिशनचा फादर रेव्हरंड ऍम्ब्रोस महाराजांची भेट घेण्यासाठी आला, त्याची विनंती होती की त्याच्या अनाथालयाला राजांच्या फौजांनी त्रास देऊ नये. राजांनी त्याला अभयदान दिले आणि खरोखरंच या सर्व कालखंडात त्या कमिशनच्या अनाथालयाला त्यांनी धक्का लागू दिला नाही. तिथेच मोहनदास पारख नावाचा विदेशी सत्तांचा एक हस्तक रहात असे. तो हयात नसला तरी तो फार मोठा पुण्यात्मा होता असे राजांना कळल्यावर त्या धार्मिक शिवाजीने त्याच्या घराला तोशीस पोहोचू दिली नाही, अशी नोंद इंग्रजांनी करून ठेवली आहे. सुरतेमध्ये असलेल्या गरीब वर्गाला या लुटीचा व शिवाजीराजांचा अजिबात त्रास झाला नाही. इतकेच नव्हे तर आगीमुळे त्यांचे जे नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांना शिवाजीराजांनी (स्वराज्यासाठी) जे अनावश्यक होते ते दान केल्यामुळे प्राप्त झाले. शिवाजीराजांनी प्रथम लुटीला आरंभ केला नाही. त्यांनी तर इनायतखानाला चर्चेसाठी व्यापारी पाठविण्यास सांगितले होते. लूट नाईलाजाने करावी लागली होती.
 
सुरतेची लूट किती भयावह असेल व शिवाजीराजांबद्दल लोकांच्या मनात किती दहशत बसली असेल, याची कल्पना इंग्रजांच्या 22 जानेवारी 1664 च्या पत्रावरून येईल. त्यात म्हटले आहे की- पुनः पुनः शिवाजी आल्याच्या वावड्या उठतात व लोक थरथर कापायला लागतात, आपली संपत्ती किल्ल्याच्या खंदकात किंवा गलबतात भरतात. एकाच झटक्यात महाराजांनी सुरतेसकट संपूर्ण मुघल साम्राज्याला प्रचंड हादरा दिला होता. सुरतेमधून जातांना महाराज मागे वळून म्हणाले की औरंगजेबाच्या सुरतेची ‘सुरत’ घेण्याची पुष्कळ दिवसांची इच्छा होती, ती आज सफल झाली. राजांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी शास्ताखानामुळे झालेली तूटच केवळ भरून काढली नाही तर या यशामुळे येणार्‍या 2-3 वर्षांच्या खर्चाचीही सोय झाली. राजांनी आपल्या बुद्धिमत्तेने व धाडसाने एक अग्निदिव्य यशस्वीपणे पार पडले होते. या लुटीमुळे ‘शिवाजी’ या नावाच्या दहशतीने मुघलांना हैराण करून सोडले होते.
••