मोदींचे धक्के!

    दिनांक :02-Jun-2019
विलास पंढरी
9860613872
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला 282 जागा मिळवत, पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होत जबरदस्त धक्का देणार्‍या मोदींनी गेल्या पाच वर्षांत अनेक धक्के दिले आहेत. त्यातील काही वादग्रस्त ठरले असले, तरी विरोधकांना नामोहरम करणारे ठरले, हेही खरे आहे. निवडणूक जिंकताच, सामान्य माणसाप्रमाणे छोट्या घरात राहणार्‍या आपल्या आईचा आशीर्वाद घेणे, स्वतःला प्रधानसेवक संबोधणे, संसदेत पाऊल टाकण्यापूर्वी संसदेला डोकं टेकवून केलेला नमस्कार, अचानक पाकिस्तानमध्ये जाऊन नवाझ शरीफांची घेतलेली भेट, युपीतील मुख्यमंत्री योगींची केलेली अनपेक्षित निवड, हरयाणातील जाटेतर असलेले खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून केलेली निवड आणि संरक्षणमंत्रिपदी केलेली निर्मला सीतारामन्‌ यांची निवड, उरीवरील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या मृत्यूचा बदला म्हणून थेट पाकिस्तानमधे घुसून केलेला धाडशी हल्ला आणि त्याचा प्रचारात खुबीने केलेला उपयोग... 
 
 
असे अनेक धक्के देत राजकीय विरोधकांना सतत बॅकफुटवर ठेवण्यात मोदी प्रचंड यशस्वी झाले. काळ्या बाजारवाल्यांबरोबरच राजकीय पक्षांनाही दणका देणारी नोटबंदी आणि तयारी नसताना आणलेली जीएसटी प्रणाली, राष्ट्रपतिपदासाठी कोविंदांची आणि उपराष्ट्रपतिपदासाठी केलेली वेंकय्या नायडूंची निवड. गंमत म्हणजे हे सगळे धक्के दृश्य स्वरूपातील होते म्हणजे मोदींचा यात प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध होता. यातील प्रत्येक धक्का मोदींचे स्थान बळकट करणारा आणि कमजोर झालेल्या विरोधकांना अधिक कमजोर करणारा होता, हे या निवडणुकीत विरोधकांचे झालेले पानिपत बघता आता लक्षात यायला हरकत नसावी. संविधानाची मोडतोड करण्याचा सतत आरोप करणार्‍या विरोधकांना, लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतरच्या पहिल्याच भाषणापूर्वी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधे ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीला मनःपूर्वक केलेला नमस्कार, हा विरोधकांच्या आरोपातील हवा काढणारा या टर्ममधील पहिला धक्का आहे.
 
खरेतर घटनादुरुस्तीसाठी लागणार्‍या दोनतृतीयांश बहुमताला केवळ 9 जागा कमी पडत असताना एनडीएत सामील व्हायला तयार असलेले आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्‌डींच्या साहाय्याने आवश्यक असलेली कुठलीही घटनादुरुस्ती मोदी आता करू शकतील. शपथविधीला केजरीवाल, ममता बॅनर्जीपर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांना बोलवून मोदींनी सर्वसहमतीच्या राजकारणाची अनपेक्षित, पण चांगली सुरुवात केली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत अखेर चौकीदार मोदींचीच जादू चालली हे उघड होतानाच, 60 वर्षे या देशात राज्य केलेल्या काँग्रेसचा सर्वत्र दारुण पराभव व्हावा आणि 17 राज्यांमध्ये हा पक्ष एक जागादेखील जिंकू शकला नाही, ही खरेतर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणार्‍या आणि पक्षाध्यक्ष असलेल्या राहुल गांधींना अमेठीची स्वत:चीही जागा वाचवता न आल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ करणे जेवढे अपेक्षित होते आणि तो स्वीकारला न जाणेही तेवढेच अपेक्षित होते. एकतर नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस टिकणं महाकठीण आणि निर्नायकी झालेल्या काँग्रेसच्या कठीण काळात राहुल गांधींनी राजीनामा देणे हा पळपुटेपणा ठरेल.
 
राहुल गांधी हे राजकारणात 15 वर्षे उमेदवारी करूनही अद्याप पक्के मुरलेले नाहीत. खरेतर गांधी कुटुंबातील जन्म, यापेक्षा त्यांची वेगळी मोठी पात्रता अजून तरी समोर आलेली नाही. गोरगरिबांना दरमहा सहा हजारांची फुकट मदत देण्याची योजना म्हणजे लोकांना आळशी बनवणारी आणि उत्पन्न लपवून खोटं बोलायला लावणारी होती. अर्थात, लोकांनीही त्यावर विश्वास ठेवला नाही व काँग्रेसला मतेही दिली नाहीत. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एवढा दारुण पराभव झाला की, केवळ 44 जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही. आता यावेळीही 52 जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार नाही. (लोकसभेतील एकूण 543 जागांच्या कमीतकमी 10 टक्के म्हणजे 55 जागा मिळणे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक असतात.) आता 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची खालच्या पातळीवर जात निंदानालस्ती करणार्‍या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व त्यांच्या भगिनी प्रियांका वढेरा यांनी भाजपाला संपविण्यासाठी विशेषतः नरेंद्र मोदी यांना संपविण्याच्या उद्देशाने ‘चौकीदार चोर हैं’पासून ‘देशद्रोही’, ‘घाबरट’ अशा अनेक अपशब्दांद्वारे मोदींवर आगपाखड केली. मोदींना संपविण्यासाठी अनेक सापळे रचले खरे, परंतु जनतेने या सर्वांनाच घरी बसविले.
 
शीखविरोधी दंगलीच्या भळभळत्या जखमा घेऊन आजही शीख बांधव जगत असताना, झालं ते झालं, त्याचं आत्ता काय, असे म्हणत त्या जखमेवरची खपली काढण्याचे कृत्य पित्रोदा यांनी केले आहे. ममतादीदी तर पिसाळल्यासारख्या झाल्या होत्या. मोदींना मी पंतप्रधान मानत नाही, त्यांच्या मुस्कटात मारावी वाटते, अशा बहुमताने निवडून आलेल्या लोकप्रिय पंतप्रधानांवर केलेल्या टीकेने 42 पैकी 2 जागा मागील निवडणुकीत जिंकलेल्या भाजपाला आपले बळ 18 जागांपर्यंत वाढवण्यासाठी मदतच केली. मायावतींनी तर अजून खालची पातळी गाठली आहे. मोदींनी आपल्या पत्नीला सोडल्याने भाजपा पुरुष कार्यकर्त्यांच्या पत्नींना आपले नवरे सोडून देतील, अशी भीती वाटते. त्यामुळे अशा बायकांनी मोदींना मते देऊ नयेत. या अजब तर्काला काय म्हणावे? मायावतींचे अविवाहित राहणे, पेहराव, रहनसहन हा त्यांचा पूर्ण वैयक्तिक मामला आहे. मोदींनी यावर भाष्य केल्याचे पाहण्यात तरी नाही. इकडे पवारसाहेब देशासह बारामतीत अनपेक्षित निकाल लागल्यास इव्हीएमवर शंका घेत लोकांचा मतदान प्रक्रियेवरील विश्वास उडेल व मोदी सरकार 15 दिवसच टिकेल, अशी भविष्यवाणी वर्तवत, मोदीच सत्तेवर येणार, हेच दर्शवीत होते.
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोदी विरुद्ध सगळे अशी 2014 सारखी स्थिती मोदींना निर्माण करायची होती आणि त्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले. त्यांचा करिष्मा आणि आत्मविश्वास भाजपाला 303 जागा मिळवण्याचे मिरॅकल करू शकला. काँग्रेसपुढे मोठा प्रश्न वेगळाच होता. किती वाचाळवीरांना तंबी देणार? मोठ्या नेत्यांवर कारवाई तरी काय करणार? संजय निरुपम, सिद्धू, दिग्विजयसिंह यांसारखे तथाकथित मोठे नेते खालच्या पातळीवर जाऊन मोदींना शिव्या देणार, मोदी त्यावर चपखल उत्तर देणार आणि शेवटी फायदा निवडणुकीत भाजपाला होणार, हा अलीकडचा इतिहास झाला आहे.
 
सोनिया गांधींनी मोदींना ‘मौतका सौदागर’ संबोधल्याने काँग्रेसला फटका बसला होता, हे विसरून राहुल आणि प्रियांका या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही मोदींवर घाबरट, देशद्रोही, चोर, भष्टाचारी अशी वैयक्तिक टीका केली. मोदी, राहुल गांधींच्या राहणीबद्दल, अजूनही अविवाहित असल्याबद्दल कधीही वैयक्तिक टीका करीत नाहीत. प्रियांका वढेरा पक्षात मोठे पद स्वीकारल्यापासून स्वतःची टिपिकल साडीतील हिंदू स्त्रीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर मोदींनी कधीही भाष्य केलेले नाही व करणारही नाहीत. राहुल किंवा प्रियांकाच्या चारित्र्यावर बोललेले लोकांना आवडणार नाही. मोदी बोलतात ते केवळ राजकीय कारकीर्दीवर, तदनुषंगिक अनियमिततांवर.
 
ज्या मोदींचे भाऊ अजूनही किराणा दुकानासारखे छोटे व्यवसाय करतात, ज्यांची आई छोट्याशा फ्लॅटमधे राहतेय आणि ज्यांनी कुठलीही प्रॉपर्टी करणे सोडाच, आपल्या पगारातील पैशातून केलेली बचतसुद्धा कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या व सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान केली, अशा नि:स्पृह माणसावर राहुल गांधींनी चोरीचे व भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःचे हसू तर करून घेतलेच, पण मोदींना निवडणूक जिंकणे अधिक सोपे केले. या निवडणुकीचे आणखी जाणवण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांनी ज्यांनी मोदींवर टीका करीत त्यांच्याशी पंगा घेतला त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, कीर्ती आझाद हे भाजपातून काँग्रेसमध्ये गेले आणि जोरदार आपटले. विरोधकातील ज्यांनी मोदींवर पातळी सोडून टीका केली असे नेते स्वतः पराभूत झाले किंवा पक्षाच्या नुकसानीस कारणीभूत झाले. त्यात ममता, मायावती, केजरीवाल, शरद पवार, राहुल व प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, मेहबुबा मुफ्ती, देवेगौडा, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, राजू शेट्‌टी, कन्हैया कुमार, चंद्राबाबू नायडू... अशी भली मोठी यादी आहे.
 
भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच ‘काँग्रेसमुक्त भारत’ नारा दिला. या नार्‍याला प्रतिसादही चांगला मिळाला आणि गेल्या पाच वर्षांत झालेल्या बहुतेक विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारून एकेक राज्य आपल्या ताब्यात घेतले. कर्नाटक व पंजाब ही केवळ दोनच राज्ये काँग्रेसच्या ताब्यात राहिली. मात्र, गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आली व राहुल गांधी निवडणूक जिंकू शकतात, हा आभास तयार झाला. मोदी 2014 मधे सत्तेवर आल्यानंतर पहिली चार वर्षे राज्यकारभार आणि शेवटच्या वर्षी राजकारण करेन, असे म्हटले होते. पण, राजकारण करायला त्यांनी अंमळ उशीरच केला. ही त्यांची चूक पक्षाला थोडीशी महागात पडून तिन्ही राज्ये गमवावी लागली. ज्या छोट्याशा मार्जिनने मध्यप्रदेश व राजस्थानात भाजपा हरली ते बघता, सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक जर मोदींनी या दोन राज्यांच्या निवडणुकीपूर्वी आणले असते, तर ही दोन्ही राज्ये भाजपाला गमवावी लागली नसती.
 
चारच महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांतील जवळपास सर्वच जागा जिंकल्याने हे सिद्ध झाले आहे. अत्यंत नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट पक्ष! एकेकाळी या देशात 60-70 खासदार निवडून येणार्‍या या पक्षाची आता काय अवस्था आहे? केवळ दोनच खासदार, अशी या पक्षाची ओळख झालेली आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने केवळ नकारात्मक भूमिका घेतली व राहुल गांधी यांच्या वागण्यातून अनेकदा अपरिपक्वता दिसून आली. त्यातच ‘चौकीदार चोर हैं’ आणि ‘राफेल... राफेल...’ या त्यांच्या निवेदनाचा उलटा परिणाम या पक्षाच्या कामगिरीवर झाला. 135 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेला काँग्रेस पक्ष एका घराण्यात गुरफटून गेल्याने नामशेष होण्याच्या परिस्थितीत आला आहे. गांधी घराणे सांगेल ती पूर्व दिशा, याप्रमाणे वागणारे हुजरे या पक्षात तयार झाले.
 
त्यांनी पक्ष वाढविण्यावर भर न देता गांधी घराण्याची पूजा करण्यातच धन्यता मानली. मात्र, इकडे घराणेशाहीची ही परंपरा भाजपाने मोडीत काढली. अपवादात्मक एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकाला उमेदवारी दिली असेल. पण, शिस्तीचा बडगा त्यांनी राबविला आणि या लोकसभा निवडणूक निकालातून घराणेशाहीचे कंबरडेच मोदी-शाह जोडीने मोडून टाकले. काँग्रेस पक्षाकडे राहुल गांधीवगळता आता दुसरा सक्षम(?) नेता राहिलेलाच नाही. दारुण पराभवाने होरपळून गेलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा वर काढणे ही अत्यंत कठीण बाब आहे. हे आव्हान म्हणून स्वीकारताना काँग्रेसला आता आपल्या ध्येय-धोरणात आमूलाग्र बदल करावाच लागेल व जर बदल केले नाही, तर या पक्षाची अवस्था कम्युनिस्टांप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही. या निवडणूक निकालानंतर तरी काँग्रेसला शहाणपणा सुचेल काय?