#ICCWorldCup2019 : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात

    दिनांक :02-Jun-2019

ब्रिस्टल,
कर्णधार ऍरोन फिंच आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकांच्या मदतीने अफगाणिस्तानवर 7 विकेटस्‌नी मात करत ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. अफगाणने दिलेले आव्हान 34.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावा करत पूर्ण केले.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना ऍरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सावध खेळी केली. गुलबदीन नबी याने फिंचला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. फिंचने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर याने नाबाद 89 धावांची खेळी करत विजयावर शिक्‍कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 38.2 षटकात सर्वबाद 207 धावा केल्या.
 
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात निराशाजनक ठरली. त्यांचे सलामीचे दोन्ही फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाल्याने त्यांची 2 बाद 5 अशी अवस्था झाली. त्यानंतर रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी तिस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
ऍडम झंपाने या जोडीला बाद करत अफगाणला लागोपाठ दोन झटके दिले. त्यानंतर कर्णधार गुलाबदीन नईबने नजीबुल्ला झाद्रानसोबत 83 धावांची भागीदारी करत डाव सावरला. गुलाबदीन नईबने 33 चेंडूत 31, तर नजीबुल्ला झाद्रानने 49 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये रशिद खानने फटकेबाजी करत 11 चेंडूत 27 धावांची खेळी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडू दिला.