ईदेनिमित्त कत्तल रोखण्यासाठी विकत घेतले अख्खे बोकड!

    दिनांक :02-Jun-2019
-सर्वधर्म जीवदया समितीची कृती
 
वडोदरा: बकरी ईदेला होणारी पशूंची कत्तल रोखण्यासाठी येथील सर्वधर्म जीवदया समिती नावाच्या पशुहक्क संघटनेने गुजरात राज्यातील पशुबाजारातून सर्व बकर्‍या आणि मेंढ्या विकत घेण्याचा निर्णय घेतला. मध्य-पूर्वेत होणारी बोकड-मेंढ्यांची निर्यात बंद करावी यासाठी या संघटनेने यापूर्वी मोहीम राबवली आहे.
आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही किंवा आमचे अभियानही कुण्या धर्माच्या विरोधात नाही. पशुहक्काबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, तसेच या चळवळीसाठी आणखी कार्यकर्ते लाभावेत यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. आम्ही पशुप्रेमी असून, क्रूर प्रथांच्या विरोधात आहोत, असे या संघटनेचे सचिव राजीव शाह यांनी सांगितले. या संघटनेकडून वडोदरा येथे प्राण्यांसाठी दोन आश्रयगृह चालवले जातात.
सूरत येथील पशुबाजारातून आम्ही जवळपास 100 बोकड आणि मेंढ्या आतापर्यंत विकत घेतल्या आहेत. उर्वरित बाजारपेठांतूनही पशू विकत घेण्याची योजना असल्याचे शाह यांनी सांगितले. ते अखिल भारतीय पशू कल्याण मंडळाचे मानद सदस्यही आहेत.
बकरी ईदेसाठी काही दिवस असल्याने आम्हाला कमी दरात बोकड-मेंढ्या विकत मिळू शकतात. आम्ही दीड लाख रुपयांत 94 बोकड खरेदी केले आहेत. बकरी ईद जवळ आल्यावर एका बोकडाची िंकमत जवळपास 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत जाईल. सध्या विक्रेते कमी दरात बोकडांची विक्री करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.