भाजपा, शिवसेना लढवणार प्रत्येकी १३५ जागा

    दिनांक :02-Jun-2019
विधानसभा निवडणुकीचे सूत्र ठरले
चंद्रकांत पाटील यांची माहिती
 
औरंगाबाद, 
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळाल्यानंतर आता दोन्ही मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठीही जागावाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. 288 सदस्यीय विधानसभेत भाजपा व शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढविणार असून, उर्वरित 18 जागा महायुतीतील मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत.
 
 
 
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपा-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीतील सूत्रानुसार भाजपा जास्त तर शिवसेना कमी जागा लढविणार, असे ठरले होते, पण विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या सूत्रानुसार, शिवसेना जास्त जागा लढवत आली आहे. आता राजकीय स्थिती बदलली आहे. भाजपाचे महाराष्ट्रासह देशभरात वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागा लढवणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चंद्रकांत पाटील सध्या मराठवाड्यातील दुष्काळी दौर्‍यावर आहेत. दोन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्या, असा प्रस्ताव अलीकडेच समोर आला होता आणि चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी तो मान्य केला. आता शिवसेना-भाजपात कुणीही लहान किंवा मोठा नाही. दोघेही समान आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.