ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारवर बलात्काराचा आरोप

    दिनांक :02-Jun-2019
साओ पाउलो, 
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर अडचणीत सापडला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये नेमारनं दारुच्या नशेत बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मात्र नेमारचे वडील आणि मॅनेजरने या महिलेने केलेला आरोप फेटाळून लावताना नेमारला ब्लॅकमेल करण्यासाठीच हा आरोप केल्याचे त्यांचे  म्हणणे आहे.
 
 
साओ पाउलो पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मारहाण करून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीची प्रत गोपनीय असल्याचे सांगून पोलिसांनी ती देण्यास नकार दिल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. माध्यम वृत्तानुसार, सोशल मीडियावरून नेमार आणि या महिलेची ओळख झाली होती. सोशल मीडियावर चॅटिंग करताना नेमारने पीडितेला पॅरिसला येऊन भेट असे सांगितले. त्यानुसार ती पॅरिसला हॉटेलात थांबली. नेमार दारुच्या नशेत हॉटेलमध्ये आला. त्या दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाल्यानंतर नेमारने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला, असा महिलेचा आरोप आहे.
नेमारवरील आरोप खोटे आहेत. तो अशा प्रकारचा गुन्हा करूच शकत नाही. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठीच हा आरोप केला आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि ते वकिलांकडे दिलेले आहेत, असे त्याचे वडील नेमार सांतोस यांनी सांगितलं.