किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री

    दिनांक :02-Jun-2019
 रायगड: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल आज येथे समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
किल्ले रायगड विकासासाठी शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यासंदर्भात किल्ले रायगड येथे आज देवेंद्र फडणवीस हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे देखील उपस्थित होते.