मिसाबंदीनी केलेल्या संघर्षामुळे आज सत्तेचा सुवर्णकाळ - आ. एकनाथ खडसे

    दिनांक :02-Jun-2019
चिखली : परकीय इंग्रजी सत्तेची जुलमी राजवट उलथून टाळण्यासाठी भारतीयांनी केलेला संघर्ष हा पहिला स्वातंत्र्यलढा होता, तर सत्ताधारी स्वकीयांच्या आणीबाणी विरोधात केलेला संघर्ष हा दुसरा स्वातंत्र्यलढा होय, आणीबाणी विरोधात मिसाबंदीनी केलेल्या संघर्षामुळेच आज आपण सत्तेचा सुवर्णकाळ अनुभवत आहोत असे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी केले. अ. भा. लोकतंत्र स्वातंत्र्य सेनानी संघाच्या वतीने शनिवार, दि. १ जून रोजी आयोजित सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, तर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांचे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते या वेळी मंचावर भाजपा प्रदेशउपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती,चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त , माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी ,गोकुळ शर्मा अ. भा.लोकतंत्र स्वातंत्र्यसेनानी संघ, जिल्हा- बुलडाणा चे अध्यक्ष रामदास कारोडे, प्रकाश गुळवे , रामदास बिडकर , रामेश्वर घोराळे , विकास डाळीमकर, अँड. व्ही.डी.पाटील आदी उपस्थित होते

 
 
 
 माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील मिसाबंदीना राज्य शासनाने मासिक निवृत्ती वेतन लागू केले आहे. यासाठी विधानसभेत विषय लावून धरल्या बद्दल आणि सातत्याने पाठपुरावा केल्या बद्दल आ. एकनाथ खडसे यांच्या सत्काराचे आयोजन अ. भा. लोकतंत्र स्वातंत्र्य सेनानी संघाच्या वतीने केले होते. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आ. खडसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना खडसे यांनी आणीबाणीचे वर्णन दुसरा स्वातंत्र्यलढा असे केले. लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी करुन तत्कालीन सरकारने होती. या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करुन मिसाबंदीनी लोकशाहीची पुनर्थापना केली असे ते म्हणाले. या प्रसंगी बोलतांना आ. चैनसुख संचेती यांनी भारत मातेला परंवैभवा पर्यंत न्यायचं आहे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा राष्ट्रीय विचार घेऊन कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली व आज भारत जगात विश्वगुरु स्थानी होण्यासाठी अग्रेसर होत आहे. आणीबाणी विरोधातील लढाईत चिखली शहर व तालुक्यातील लोकशाहीप्रेमी कार्यकर्त्यांनी महत्वाचे योगदान केल्याचा आवर्जुन उल्लेख केला.