धनेशाचा धनी डॉ. राजू कसंबे

    दिनांक :02-Jun-2019
स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजार्‍यांनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर 500 क्रेन्स पक्षी आलेले आहेत- राजू कसंबे’, इतकेच त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण 500 क्रेन्स एकावेळी पहायला मिळणार होते; पण तत्क्षणीच मनात एका व्यक्तीने कायमच घर केलं. घरी भेट न झाल्यामुळे चिठ्ठी लिहून ठेवणारे आणि आवडीने नवख्या तरुणाला निसर्गाशी जोडणारे डॉ. राजू कसंबे म्हणजे निसर्ग गुरुच होय. काही व्यक्ती असतातच अशा की, त्यांचा सहवास आणि बोलणं म्हणजे कायम उर्जा देणारं..! ते सतत सक्रीय आणि सकारात्मक विचारांनी भारलेले असतात. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शालेय जीवन व्यतीत केलेल्या डॉ. राजू कसंबे यांचा जीवनपट म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासाचा ग्रंथच म्हणावा लागेल.
 
 
 
 
ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारा हा तरुण गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतो. आपल्या चटणी- भाकरीचा किस्सा सांगताना तो भाऊक होतो. ‘अपना भी एक किस्सा है’, असं म्हणताना तो हसतोही; पण त्या हसण्यात प्रचंड संघर्ष दडलाय. पाच बहिणी आणि चार भाऊ असा गोतावळा अन्‌ घरची जेमतेम परिस्थिती होती. कशीबशी पदवी संपादन केल्यानंतर नोकरी शिवाय पर्यायही नव्हता. स्वतःच स्वप्न मारून एका खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारून पुढे विविध विषयात 9 पदव्या संपादन करण्याची धमक ठेवणारा हा तरुण पाहता पाहता निसर्ग संशोधनाचं शिवधनुष्य पेलायला लागला. नोव्हार्टीस सारख्या प्रसिद्ध औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून साडे सतरा वर्षे काम केल्याचा प्रवास उलगडताना राजू कसंबे एक वेगळ्या रूपाने आपल्या समोर येतात. एक एक पक्षी अगदी निरखून पाहण्यात ते वस्ताद आहेत. आपल्या निसर्ग प्रवासात अनेकांना सहप्रवासी करण्याची त्यांची सवय शिकण्यासारखी आहे. सन 1997 ते 2004 पर्यंत अमरावती येथे त्यांनी युथ होस्टेल्स असोसिएशन सोबत काम केलं. पुढे अमरावतीला त्यांनी वन्यजीव व पर्यावरण संस्थेची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील नल-दमयंती सागराच्या मुखावर वर्धा नदीच्या थडीला वीण करणार्‍या निळ्या शेपटीच्या वेडाराघु या पक्ष्यांवर त्यांनी संशोधन करून एम.एस.सी.ची पदवी पूर्ण केली. सन्‌ 2004 ते 2010 दरम्यान नागपूर येथे डॉ. अनिल िंपपळापुरे व गोपाळराव ठोसर सरांच्या ते संपर्कात आले. त्याच दरम्यान त्यांनी सेवादल महिला महाविद्यालयातून आचार्य पदवीही मिळविली. खरं म्हणजे एका पक्ष्यावर कुणी आचार्य पदवी करू शकतो का..? एका पक्ष्यावर आचार्य पदवी संपादन करून संशोधन करण्याचा विदर्भात एक नवा पायंडा पाडण्यात कसंबे यांनी आपला कसब दाखविलेय्‌. नागपूर येथील महाराज बाग परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करताना त्यांना एक दिवस िंशगासारखी चोच असलेला पक्षी दिसला. िंशगचोच्या पक्ष्याचे दर्शन डॉ. कसंबे यांच्या आयुष्याला कलाटणी देईल, असे ध्यानीमनीदेखील नव्हते. एका पक्ष्यावर पीएचडी करून गगनभरारी कशी घेता येऊ शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. राजू कसंबे होत. िंशगचोच्या किंवा भारतीय राखी धनेश पक्ष्यावर संशोधन करताना त्यांची दमछाक तर होत होतीच मात्र त्यातला आनंद त्यांना अधिक सुखावणारा होता.
निसर्गवाटेचा हा वाटसरू हळूहळू पक्ष्यांमध्येच अधिक रमायला लागला. केवळ आणि केवळ पक्ष्यांचीच दुनियादारी असंच त्यांचं विश्व झालेलं. म्हणतात ना निसर्गही अशांना आपल्या कुशीत घेतो. त्याला अशी माणसं हवीच असतात. त्याची योजना न्यारीच. नोव्हेंबर 2009 मध्ये कसंबे यांनी ‘थ्री इडियट्स’, हा चित्रपट पाहिला. त्यांच्यातला खरा पक्षीप्रेमी बाहेर आला. म्हणूनच दि. 31 डिसेंबर 2009 मध्ये त्यांनी नोकरीचा चक्क राजीनामाच देऊन टाकला. बक्कळ पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन तब्बल चार महीने घरी बसून बेरोजगारीत काढणे त्यांनी पसंत केले. मात्र, पुढे एप्रिल 2010 मध्ये ते मुंबई स्थित बीएनएचएस या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून रुजू झालेत. आयबीए प्रोग्रामसह ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांनी संवर्धन शिक्षण केंद्राचे प्रभारी म्हणून काम सुरू केले. एप्रिल 2018 मध्ये सहाय्यक संचालक (शिक्षण) यासह बीएनएचएस मुंबईच्या संवर्धन शिक्षण केंद्राचा कार्यभारही ते सांभाळत आहेत. पक्षी व पर्यावरण शिक्षण, हे त्यांचे मुख्य काम असून हौशी निसर्गप्रेमींसाठी ते अभ्यासक्रमसुद्धा चालवितात. आजवर त्यांची 7800 छायाचित्रे विकिपेडियाला अपलोड झालेली आहेत. त्यांचे तीन ई-बूक मोफत स्वरूपात इंटरनेट उपलब्ध असून त्यांचे 1,82,000 डाउनलोड झाले आहेत. निसर्गविषयक लेखन तसेच कविता लेखनासह पक्षी फुलपाखरेसुद्धा महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात. त्यांनी पक्षी व फुलपाखरे या विषयावर आजवर एकूण 13 पुस्तके व 100 हून अधिक शास्त्रीय प्रकाशने, तसेच पक्षी व फुलपाखरांविषयी अनेक मराठी लेख व कविता लिहिल्या आहेत. भारतातील संकटग्रस्त पक्षी हे सन्‌ 2009 मध्ये प्रकाशित झालेलं त्याचं पहिल पुस्तक होय. धनेशाचे गुपित, इंडिअन ग्रे हॉर्नबिल, थ्रेटन्ड् बर्ड्स ऑफ महाराष्ट्र, इम्पॉर्टंट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्रा, पॉप्युलर बर्ड्स ऑफ मिझोरम, इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरियाज ऑफ इंडीया आणि बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट्स ही त्यांची पुस्तके आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये दिलेलं योगदान आणि पक्षी या विषयाला अनुसरून केलेल्या परेदशवार्‍या मोलाच्या आहेत. विदर्भातील एका शेतकरी कुटुंबातून थेट मायानगरी पर्यंतचा प्रवास, पक्षी या विषयाला आपलं सर्वस्व मानून जगण्यातलं सातत्य, बोलका स्वभाव आणि वैयक्तिक व समाजिक जीवनातील योगदान माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. धनेशाच्या धन्याचे म्हणजेच डॉ. राजू कसंबे यांच्यामुळे महाराष्ट्र पक्षी चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली हे वास्तव आहे.
 
 यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500