समाजमाध्यमांवरील पोस्टवरून होणार अमेरिकी व्हिसाचा निर्णय

    दिनांक :02-Jun-2019
- अमेरिकेचे नवे धोरण
 
मुंबई: अमेरिकेने वर्षभरापासून तयार केलेल्या व्हिसा धोरणाची अंमलबजावणी होणार असून, याअंतर्गत पर्यटनासह इतर व्हिसा अर्जदारांना मागील पाच वर्षांत वापर केलेल्या समाजमाध्यमांचे युजरनेम व्हिसासाठी अर्ज करताना द्यावा लागणार आहे.
30 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या वर्षात भारतातील अमेरिकी दूतावासाने 8.72 लाख व्हिसा वितरित केले आहेत. जागतिक पातळीवर विचार केल्यास दरवर्षी 1.47 कोटी लोकांना अमेरिकी व्हिसा प्राप्त झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाईम्सने दिले आहे. आता व्हिसासाठी अर्ज करणार्‍यांना त्यांच्या समाजमाध्यमांची माहिती द्यावी लागणार आहे.
 

 
 
 
गैर-निर्वासित आणि निर्वासित व्हिसा अर्जदारांनी ई-अर्ज डी-160 आणि डी-260 भरणे आवश्यक आहे, तसेच तो अर्ज अमेरिकन वकिलातीत सादर करावा लागेल. या अर्जात काही नवीन रकाने समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार अर्जदाराला तो पाच वर्षांपासून वापरत असलेल्या समाजमाध्यमांवरील युजरनेम आणि माध्यमांची माहिती द्यावी लागेल. यात पासवर्ड देण्याची गरज नाही.
या अर्जात नवीन रकाने जोडण्यात आले आहेत, त्यात फेसबुक, फ्लिकर, गूगल प्लस, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन  आणि यू-ट्यूबचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार या रकान्यांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. तथापि, व्यवसायात अनेक युजर्स एकाचवेळी वापर करीत असलेल्या माध्यमांची माहिती व्हिसात देण्याची गरज नाही.
अमेरिकेने याबाबतची माहिती जाहीर करून हे धोरण मागील वर्षी मार्चमध्ये जाहीर केले. या धोरणात संशोधन होईपर्यंत केवळ निवडक व्हिसा अर्जदारांनाच समाजमाध्यमांचे तपशील देण्यास सांगण्यात आले होते.
दहशतवादी पृष्ठभूमीसह इतर कारणामुळे अनेकांचे अर्ज अस्वीकारार्ह असू शकतात यामुळेच व्हिसा जारी करताना काळजी घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेतील विधि कंपनीचे भागीदार मिशेल वेक्सलर यांनी सांगितले.