घरपरिवारातून राष्ट्रभक्तीचे संस्कार आवश्यक

    दिनांक :02-Jun-2019
प्रमुख संचालिका शांताक्का यांचे आवाहन
राष्ट्र सेविका समिती वर्गाचा समापन कार्यक्रम
 
अमरावती: देशभक्त जर घराघरात निर्माण व्हावे असे वाटत असेल तर इतिहासाचा अभ्यास करून तशी भावना मनात निर्माण व्हावी लागेल. घरपरिवारातून राष्ट्रभक्तीचे संस्कार होणे महत्त्वाचे असून स्वराष्ट्र, स्वधर्म रक्षणाची जागृती शाखांच्या माध्यमातून होते, प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.
राष्ट्र सेविका समितीचा पश्चिम क्षेत्राचा प्रबोध व विदर्भ प्रांताचा प्रवेश वर्गाचा समापन कार्यक्रम 1 जून रोजी सांयकाळी 6.30 वाजता साईनगर येथील तखतमल इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर झाला. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
 

 
 
 
यावेळी व्यासपिठावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जपयपुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहीणी आठवले, पश्चिम क्षेत्र कार्यवाहीका सुनंदा जोशी, वर्गाधिकारी स्वाती टिळक, आरती तिवारी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
शांताक्का पुढे म्हणाल्या, हिंदू संस्कृती पुरातन असून त्यावर सतत आक्रमण झाली आहे. झालेली हानी भरून काढणे आवश्यक आहे. श्रीराम, श्रीकृष्ण अवतार व अनेक महापुरुषांचा जन्म हा दृष्टांचा संहार करण्यासाठी झाला. प्रत्येक युगात जेव्हा दृष्ट प्रवृत्ती वाढली तेव्हा तीचा नायनाट करण्यासाठी महापुरुष जन्माला आले. भारतात कुटुंबपद्धती महान आहे, मातृशक्तीच्या प्रेरणेने व्यक्ती घडत गेले. शिवाजी महाराजांनी हिंदुसाम्राज्य निर्मिती केली म्हणून आज आपण हिंदू आहे. राष्ट्र सर्वोपरी असे मानणार्‍या अनेक संस्थांच्या संघटित कामातून कार्याची व्याप्ती होणार आहे. राष्ट्रीय विचारांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे भारत विश्वगुरु होण्याच्या मार्गावर अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. जयपुरकर म्हणाले, राष्ट्रभक्तीचे बीजारोपण या वर्गाच्या माध्यमातून होते आहे. असे वर्ग ज्यातून राष्ट्रप्रेम शिकविल्या जाते ते अत्यंत आवश्यक आहे आहे. हे संस्कार भावी आयुष्यात अत्यंत उपयोगी ठरतात हे सिद्ध झाले आहे. राष्ट्रसेविका समितीचा प्रवेश व प्रबोध वर्ग यशस्वीरीत्या संपन्न झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांनी सेविकांना शुभेच्छा दिल्या.
सुरूवातीला प्रार्थना व दोनही वर्गातील सेविकांनी लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर केली. श्रुती हेबळी हीने वैयक्तीक गित सादर केले. प्रास्ताविक प्रांत बौद्धीक प्रमुख श्रद्धा पाटखेडकर, संचालन अर्चना देवळीकर तर उपस्थितांचे आभार वर्ग कार्यवाहिका गौरी लवाटे यांनी मानले. समापन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.