गोव्याला जाणाऱ्या तरुणांचा अपघात ; सात ठार

    दिनांक :02-Jun-2019
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन गोव्याला जाणाऱ्या तरुणांचा  पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतले सातही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हे सातही जण औरंगाबाद येथील रहिवासी होते. बेळगावमधील श्रीनगर येथील महामार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. तसेच या अपघातात ट्रकची समोरील बाजू चेपली गेली आहे. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 
 
 
आज दुपारी बेळगावच्या श्रीनगर गार्डनजवळील पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजुला गेली. याचदरम्यान,कोल्हापूरहून येत असलेल्या एका भरधाव ट्रकने अपघातग्रस्त कारला जोरदार धडक दिली. यात कारचा पूर्णत: चेंदामेदा झाला. मृत सगळे औरंगाबाद जवळच्या दौलताबाद आणि शरणापूरचे आहेत. सर्व मित्र गोव्याला फिरण्यासाठी जात होते. आज सकाळी कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन घेतले. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले होते. मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला.